मुंबईतील घाटकोपर परिसरात बुधवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. अशोक नगरमधील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा काही भाग अचानक कोसळून दोन ते तीन घरांवर दरड आली. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक अडकल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डोंगराचा मोठा भाग घरांवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि घाटकोपर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख हे ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची सद्यस्थिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
मृत
समीर अन्सारी
अबान आरिफ शेख
मन्नत आरिफ शेख
मर्जीना आरिफ शेख
मोहम्मद आरिफ
साहिल हुसेन अब्दुल कादर
विकीत रमेश यादव