घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विविध मंडळांकडून मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून, गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवालाही मोठी गर्दी झाली असून, कृष्णा पाटील यांच्या आयोजनाखाली हा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. या दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने उपस्थिती लावली.यावेळी गौतमी पाटीलने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दहीहंडी उत्सवाचा आपण मनापासून आनंद घेत असून, प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि आशीर्वाद कायम मिळत राहावेत, अशी इच्छा तिने व्यक्त केली. आपल्या चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचल्याचेही गौतमीने सांगितले.विविध ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाबद्दल विचारण्यात आले असता गौतमीने मुंबईतील दहीहंडीचा उत्सव आपल्यासाठी विशेष असल्याचे सांगितले. प्रेक्षकांसोबत हा सण साजरा करताना आपल्याला खूप आनंद मिळतो, असे तिने नमूद केले. गावाकडील दहीहंडीचा अनुभव असला तरी मुंबईतील उत्सवाचा माहोल वेगळाच असल्याचे गौतमीने सांगितले.
घाटकोपरमधील या उत्सवात गौतमी पाटीलसह विविध कलाकारांच्या नृत्य आणि लावणीच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दहीहंडीच्या थरारासोबत मनोरंजनाचीही मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे.दरम्यान, दहीहंडीमध्ये गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दाही गौतमीसमोर मांडण्यात आला. यावर तिने गोविंदांना महत्त्वाचा संदेश दिला. सणाच्या उत्साहात सहभागी होताना स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन तिने केले. जोशात असतानाही स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, असे गौतमीने सांगितले.तिला गोविंदा बनण्याची संधी मिळाली तर कोणत्या थरावर चढायला आवडेल, असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला. त्यावर ठराविक थर सांगता येणार नसला तरी जिथे संधी मिळेल तिथून दहीहंडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याचे तिने म्हटले. सध्या मुंबईतील दहीहंडी उत्सवाचा आनंद घेत असून, आणखी काही ठिकाणी जाणार असल्याचेही गौतमीने सांगितले.