गणेशोत्सवाच्या आनंदमयी वातावरणानंतर महाराष्ट्रभर आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोकणापासून मुंबई, रायगड आणि भिवंडीपर्यंत सर्वत्र ढोल-ताशांचा गजर, खालुबाजा, लेझीम, गुलालाची उधळण आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पहाटेपासूनच घराघरांत अंतिम आरती आणि नैवेद्याचा कार्यक्रम पार पडला. कुटुंबीयांनी फुलांनी सजवलेल्या बाप्पाला मिरवणुकीतून विसर्जनासाठी नेले. समुद्रकिनारे, नद्या आणि तलावांवर भाविकांची मोठी गर्दी झाली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याची प्रार्थना होती.
भिवंडीत भावनांचा महापूर
भिवंडीतही दीड दिवसांच्या गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. गणेश चतुर्थीला घराघरांत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आज सायंकाळी आरती करून बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी वातावरण भारावून गेलं. विसर्जन घाटांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महापालिकेने सर्व घाटांवर भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था केली होती.
दादर चौपाटीवर भक्तांची गर्दी
मुंबईतही विसर्जनासाठी दादर चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त दाखल झाले. बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली होती. विसर्जन सुरळीत पार पडावं म्हणून मुंबई महापालिकेने सुरक्षा, स्वच्छता, लाइफगार्ड, वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष तयारी केली होती.
यावेळी अभिनेता आशुतोष गोखले आपल्या घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी दादर चौपाटीवर पोहोचला. त्याने बाप्पाला निरोप देतानाचा भावनिक अनुभवही माध्यमांशी शेअर केला.
परंपरा आणि भावनेचा संगम
दीड दिवसांच्या गणपतीची परंपरा विशेषतः कोकणात अनेक पिढ्यांपासून जपली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, बाप्पाला अल्पकाळ घरात ठेवून विधिवत पूजा करून विसर्जन करण्याची ही प्रथा आजही अनेक कुटुंबांत कायम आहे.
दरम्यान, राज्यभरात विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क होत्या. प्रमुख विसर्जन घाटांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, बचाव पथके आणि नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
अखेरीस, बाप्पाला निरोप देतानाचा प्रत्येक क्षण भावनिक ठरला. ढोल-ताशांचा गजर थांबला, आरती संपली, गुलाल हवेत विरला; पण प्रत्येक भक्ताच्या मनात एकच प्रार्थना घुमत राहिली 'गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!'