गणेशोत्सव सण हा उत्साहाचा असला तरी सध्या घडत असलेल्या काही अघटित घटनांनी या सणात व्यत्यय आल्याचे पाहायला मिळत आहे. आधी भुलेश्वर मग कुर्ला येथील गणेशमूर्त्यां कोसळल्याची बातमी ताजी असतानाच अजून एका घटनेची यात भर पडलेली आहे. गणेश आगमनावेळी मूर्ती कोसळल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यात वादळी वाऱ्यामुळे गणेशमूर्तीचा तोल जाऊन कार्यकर्त्यांवर कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
नालासोपारा-विरार पश्चिम येथे यशवंत गौरव येथे गणपतीची मूर्ती मागे उभ्या असलेल्या लोकांवर कोसळली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी स्थानिक लोक गणेश मूर्तीचे प्लास्टिकच्या शीटने संरक्षण करत असताना, ती मूर्ती मागे उभ्या असलेल्या लोकांवर पडल्याने थोडा गोंधळ उडाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते शनिवारी दुपारी मूर्तिकाराच्या कारखान्यातून मूर्ती आणण्यासाठी गेले होते. ट्रॉलीवर मूर्ती बसवून मोठ्या उत्साहात आगमन मिरवणूक मोरेगावच्या दिशेने निघाली होती. मिरवणूक ‘फन फिएस्टा’ थिएटरजवळ पोहोचली असता मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरू झाले. पावसापासून बचाव करण्यासाठी कार्यकर्ते मूर्तीवर प्लास्टिकचे कापड झाकत असतानाच, अचानक तोल बिघडल्याने मूर्ती ट्रॉलीवरून खाली कोसळली.
दरम्यान सुदैवाने, प्राथमिक माहितीनुसार सर्वजण सुरक्षित असून, कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. गणेशोत्सवाच्या काही दिवसांपासूनच मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मूर्तीच्या स्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू होती. मात्र, उत्सवाच्या तोंडावरच मूर्तीची अशी अवस्था झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीसोबतच हळहळही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गणेश मंडळ, कार्यकर्ते आणि मूर्तिकारानेही या घटनेची दखल घेणे आवश्यक आहे. मूर्तीची ने-आण करताना वाहतूक क्षमता, रस्त्यांची अवस्था, गतिरोधक व वीजवाहिन्या अशा इतर महत्त्वाच्या बाबींची सखोल तपासणी ही गणेश मंडळ व कार्यकर्त्यांनी करायला हवी.