वर्षभर ज्या दिवसाची सर्वजण वाट बघत तो दिवस अखेर उजाडला आहे. लाडक्या गणरायाचे आज देशभरातील मंडळात आणि अनेकांच्या घरोघरी आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा करून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते आणि पुढील काही दिवस घराघरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. मात्र, गणपती बाप्पाचा मुक्काम साधारणपणे दहा दिवसांचाच का असतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा हा कालावधी धार्मिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून विशेष मानला जातो. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाचे आगमन होते, तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. या दहा दिवसांच्या काळात गणपतीची मनोभावे पूजा, आरती, नैवेद्य आणि विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात.
गणपती बाप्पाचा मुक्काम दहा दिवस का असतो?
गणपती बाप्पा दहा दिवस राहतात कारण आपल्याकडे प्रत्येक देवताच्या भक्तीचे नऊ प्रकार आहेत श्रवणम, किर्तनम, पादसेवनम, अर्चनमसह नऊ प्रकार आहेत. नऊ भक्तीसाठी नऊ दिवस रोज एका भक्तीच्या माध्यमातून आराधना करून गणपती बाप्पाला प्रसन्न करून इच्छित फलप्राप्तीची प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. म्हणून गणपती बाप्पांचा दहा दिवस मुक्काम असतो अशी आध्यात्मिक माहिती आचार्य ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी दिली.
पौराणिक कथा काय आहे?
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशांनी महर्षी व्यासांनी सांगितलेले महाभारताचे लेखन सलग दहा दिवस केले आणि त्यानंतर व्यासांनी गणेशांची पूजा केली, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा दहा दिवसांचा कालावधी विशेष मानला जातो. या काळात बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी मुक्काम करून त्यांच्या सुख-समृद्धीच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे.
दहा दिवस भक्तिभावाने बाप्पाची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला जातो. त्यामुळे बाप्पाचा हा दहा दिवसांचा मुक्काम केवळ एक धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, भक्ती, उत्साह आणि संस्कृती यांना जोडणारा महत्त्वाचा उत्सव मानला जातो.