नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम राबवली असून या मोहिमेंतर्गत गुजरातमधून नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असलेली स्पेशल स्वीट बर्फी जप्त करण्यात आली आहे. यावेळी गुजरातमधून नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या आणलेली 2155 किलो स्पेशल स्वीट बर्फी जप्त करण्यात आली आहे.
यादरम्यान द्वारका, नाशिक येथे पहाटेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली होती. यात 2155 किलो बर्फीचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न व औषध प्रशासन पथकाकडून ताब्यात घेण्यात आला असून जप्त केलेल्या बर्फीची किंमत तब्बल 5 लाख 58 हजार 267 रुपये असण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विजय आणि बलदेव या दोन खासगी बसमधून बर्फीची वाहतूक केली जात होती. अन्नपदार्थाची वाहतूक करताना अस्वच्छ वातावरण आणि विनापरवाना वाहतूक केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच बर्फीची वाहतूक करताना आवश्यक तापमानाची अट पूर्ण करण्यात आलेली नसल्याने साठा जप्त करण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली असून जप्त केलेला बर्फीचा साठा नष्ट करण्यात आला आहे.