पेपरफुटीच्या आरोपांनी गाजलेल्या औषध निरीक्षक पदाची भरती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न परीक्षेपूर्वीच काही ठराविक उमेदवारांपर्यंत पोहोचल्याच्या गंभीर तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या.
तक्रारींची दखल घेत आयोगाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे (CID) चौकशीची मागणी केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. आता या पदांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार असून उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्कही आकारले जाणार नाही.
MPSC जाहिरात क्र. 116/2025 अंतर्गत औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या एकूण 109 जागा होत्या. तर 506 मुलाखतीसाठी पात्र, 22 जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या 485 आणि अपात्र ठरलेल्या तीन, अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. असं असताना भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता 109 जागांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
औषध निरीक्षक भरती — DATA
पद: औषध निरीक्षक, गट-ब
परीक्षा: 22 मार्च 2026
मुलाखतीसाठी पात्र: 506
मुलाखती पूर्ण: 488
पात्र उमेदवार: 485
तक्रारी: प्रश्नसंच आधीच मिळाल्याचा दावा
पोलिस चौकशी: एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न
निर्णय: संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द
आता: फेरपरीक्षा; पुन्हा अर्ज/शुल्काची गरज नाही.