गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत जोरदार आगेकूच केली आहे. आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा आणि सांगली या भागांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः धान पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असून, पिकाला आवश्यक असलेली ओलावा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी मुंबईसह कोकणात ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा आणि सातारा घाटमाथा या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव आणि हिंगोलीत 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पहाटे पावसाने हजेरी लावली. सुमारे 15 ते 20 मिनिटे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. पिके करपू लागल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत तब्बल 44 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली आहे. कारंजा, धनज, मनभा तसंच मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आणि पारवा परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, महिनाभर पाऊस नसल्याने सोयाबीन, तूर आणि कापसाची पिकं अक्षरशः वाळून पिवळी पडली आहेत.
त्यामुळे आता आलेला हा रिमझिम पाऊस पिकांसाठी फारसा उपयोगी ठरणार नसल्याची स्थिती आहे. पिकांना सावरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असताना रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत फारसा दिलासा मिळालेला नाही. 44 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस आला, मात्र तोपर्यंत हातातोंडाशी आलेली पिकं करपल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.