मुंबई : अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे किडनी, यकृत, फुफ्फुस, हृदय प्रत्यारोपणासाठी रुग्णांना कोट्यवधींची मदत उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमार्फत गरजू रुग्णांसाठी ही मदत दिली जाणार आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या खर्चिक उपचारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधार मिळाला आहे. 798 रुग्णांना नवजीवनाची आशा पल्लवीत झाली असून प्रत्यारोपणासाठी 15.79 कोटींची मदत मिळणार आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी किडनी प्रत्यारोपणाकरता 617 रुग्णांना 12.23 कोटी, यकृत प्रत्यारोपणासाठी 162 रुग्णांना 3.21 कोटी, फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी 3 रुग्णांना 6 लाख रुपये तर हृदय प्रत्यारोपणासाठी 16 रुग्णांना 28 लाख 50 हजारांची आर्थिक मदत दिली गेली आहे.