उन्हाळ्यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना वीजदरवाढीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. पावसाळा सुरू झाल्यानंतर वीजबील कमी येइल या आशेवर वीजग्राहक बसले होते. मात्र महावितरणाने एक मोठा निर्णय घेतला असून पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या ऑगस्ट महिन्याच्या बिलाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात झालेल्या वीज वापरासाठी महावितरणने इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charge) लागू केलं आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक, औद्योगिक आणि इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना प्रत्येक युनिटमागे अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे. वापराच्या स्लॅबनुसार या शुल्काची रक्कम वेगवेगळी असेल.
यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला काही प्रमाणात महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली. या अतिरिक्त वीजखरेदीचा खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) निर्देशानुसार इंधन समायोजन शुल्क आकारण्यात येत असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड; मुंबई अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा, पार्थ पवारांचे निकटवर्तीय…
घरगुती ग्राहकांना किती अतिरिक्त पैसे द्यावे लागणार?
घरगुती वीज वापराच्या श्रेणीनुसार ग्राहकांवर वेगवेगळ्या प्रमाणात शुल्क आकारलं जाणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील ग्राहक: 10 पैसे प्रति युनिट
100 युनिटपर्यंत वापर: 20 पैसे प्रति युनिट
101 ते 300 युनिट: 40 पैसे प्रति युनिट
301 ते 500 युनिट: 50 पैसे प्रति युनिट
500 युनिटपेक्षा अधिक वापर: 60 पैसे प्रति युनिट
व्यापारी आणि उद्योगांनाही फटका
इंधन समायोजन शुल्काचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांपुरता मर्यादित राहणार नाही. कमी दाबाच्या व्यावसायिक ग्राहकांसाठी वापराच्या श्रेणीनुसार 40 ते 60 पैसे प्रति युनिट अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. औद्योगिक ग्राहकांनाही या शुल्काचा सामना करावा लागणार आहे. कमी दाबाच्या उद्योगांसाठी प्रति युनिट 25 ते 35 पैसे, तर उच्चदाबाच्या उद्योगांसाठी श्रेणीनुसार 30 ते 45 पैसे अतिरिक्त आकारले जातील.
EV चार्जिंगही महागणार
इलेक्ट्रिक वाहनधारकांनाही या निर्णयाचा परिणाम जाणवणार आहे. ई-व्हीकल चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट 30 पैसे इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.
शेतीच्या वीज वापरावरही शुल्क
शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेवर प्रति युनिट 15 ते 25 पैसे इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आलं आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा भार राज्य सरकारकडून उचलला जात असल्याने या अतिरिक्त शुल्काचा आर्थिक परिणाम सरकारच्या तिजोरीवर होणार आहे.
स्वस्त वीजदराच्या दाव्यानंतर अतिरिक्त शुल्काचा भार
एप्रिलमध्ये नवीन वीजदर लागू करताना ग्राहकांना वीजदरात दिलासा मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता इंधन समायोजन शुल्कामुळे प्रत्यक्ष वीजबिलात अतिरिक्त रक्कम जोडली जाणार आहे. त्यामुळे वीजबिलाचा भार वाढणार असल्याने सामान्य ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.