Drone Attack On Indian Cargo Ship: ओमानच्या किनाऱ्याजवळ एका भारतीय मालवाहू जहाजावर संशयित ड्रोन हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 'हाजी अली' असे या जहाजाचे नाव असून, या हल्ल्यानंतर जहाज समुद्रात बुडाले आहे. सुदैवाने, ओमानच्या तटरक्षक दलाने तत्परता दाखवत जहाजावरील सर्व 14 भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवले आहे. भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, व्यावसायिक जहाजांवरील असे हल्ले 'निंदनीय' आणि 'अस्वीकार्य' असल्याचे म्हटले आहे.
पहाटे 3:30 वाजता झाला हल्ला
गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील सलाया बंदरात नोंदणीकृत असलेले 'हाजी अली' हे जहाज सोमालियाहून शारजाकडे जनावरे घेऊन जात होते. बुधवारी पहाटे 3:30 च्या सुमारास हे जहाज ओमानच्या उत्तर किनाऱ्यावरील लिमाहजवळून जात असताना एका अज्ञात स्फोटक वस्तूने (ड्रोन किंवा क्षेपणास्त्र) त्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली आणि संतुलन बिघडल्याने जहाज समुद्रात बुडाले.
बचावकार्य आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता
जहाजावर आगीच्या ज्वाला पसरताच तंदेल आणि 13 कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून लाईफबोटचा आधार घेतला आणि मदतीसाठी संदेश पाठवला. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य राबवून सर्व खलाशांना दीबा बंदरात सुखरूप आणले. जहाजाचे मालक सुलतान अहमद संघार यांनी सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहती दिली आहे. इंडियन सेलिंग व्हेसल्स असोसिएशनने खलाशांची कागदपत्रे सुरक्षित असल्याचे सांगत त्यांना लवकर मायदेशी आणण्याचे आवाहन सरकारला केले आहे.
भारत सरकारचा तीव्र निषेध
परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर अधिकृत भूमिका मांडताना म्हटले आहे की, "व्यावसायिक जहाजे आणि निष्पाप खलाशांना लक्ष्य करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. नौकानयन आणि सागरी व्यापाराच्या स्वातंत्र्यात अडथळा आणणाऱ्या अशा कृतींचा आम्ही निषेध करतो." या हल्ल्यासाठी नेमके कोण जबाबदार आहे, याची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र ओमानचे अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
गुजरातच्या जहाजांवरील वाढता धोका
एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत गुजरातशी संबंधित जहाजावर झालेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी 'अल फैज नूर सुलेमानी-1' हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत अशाच प्रकारच्या प्रादेशिक संघर्षात बुडाले होते. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आखाती देशांतील व्यस्त सागरी मार्गांवर व्यापारी जहाजांची सुरक्षा धोक्यात आली आहे, ज्यामुळे गुजरातच्या सागरी व्यापारात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. ओमानजवळ झालेल्या या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा धोक्यात आली असून, भारताने राजनैतिक स्तरावर हा मुद्दा गांभीर्याने घेण्याचे संकेत दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.