Dowry Deaths : हुंडा बळींचे भीषण सत्र! वेगवेगळ्या शहरांतील 3 तरुणींचा संशयास्पद अंत; सुशिक्षित, उच्चभ्रू म्हणवणाऱ्या कुटुंबांतील ‘हुंडा’ प्रथेचा क्रूर चेहरा

देशात दरवर्षी साधारण 1 कोटी विवाह सोहळे पार पडतात, ज्यातील सुमारे 90 टक्के लग्नांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हुंड्याची देवाणघेवाण होते.
Dowry Deaths : हुंडा बळींचे भीषण सत्र! वेगवेगळ्या शहरांतील 3 तरुणींचा संशयास्पद अंत; सुशिक्षित, उच्चभ्रू म्हणवणाऱ्या कुटुंबांतील ‘हुंडा’ प्रथेचा क्रूर चेहरा

Dowry Death Cases in Rich Families in India : भारतातील वेगवेगळ्या 3 मोठ्या शहरांमध्ये अवघ्या काही दिवसांत घडलेल्या 3 तरुणींच्या मृत्यूच्या धक्कादायक घटनांनी देशातील हुंडाबळीची (Dowry Deaths) भयानक वास्तवता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. ग्रेटर नोएडाची दीपिका नागर, भोपाळची ट्विशा शर्मा आणि कर्नाटकची ऐश्वर्या या तीन वेगवेगळ्या राज्यांतील सुशिक्षित मुली होत्या. कुटुंब वेगळे, शहरे वेगळी असली तरी त्यांचा अंत मात्र एकाच हुंड्याच्या क्रूर मानसिकतेमुळे झाला. देशात दरवर्षी साधारण 1 कोटी विवाह सोहळे पार पडतात, ज्यातील सुमारे 90 टक्के लग्नांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हुंड्याची देवाणघेवाण होते. सध्याच्या काळात हुंडा या शब्दाची जागा 'गिफ्ट' किंवा 'भेटवस्तू' या गोंडस नावाने घेतली असून, सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबेही या अमानुष प्रथेला खतपाणी घालत असल्याचे या घटनांवरून अधोरेखित झाले आहे.

1. ग्रेटर नोएडा: 4 थ्या मजल्यावरून ढकलून दीपिकाची हत्या?
ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या 27 वर्षीय दीपिका नागर हिचा रविवार रात्री संशयास्पद मृत्यू झाला. तिचा मृतदेह इमारतीच्या 4 थ्या मजल्याखाली रक्ताच्या थारोळ्यात सापडला असून, तिच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर 6 ते 8 जखमा आढळल्या आहेत. दीपिका बीएड (B.Ed) पास होती. तिचे वडील संजय नागर (दिल्ली जल बोर्डचे कर्मचारी) यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी तिचा विवाह ऋतिक याच्याशी करून दिला होता. लग्नात सुमारे 1 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही, सासरच्या मंडळींनी फॉर्च्युनर कार आणि 50 लाख रुपयांच्या अतिरिक्त हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. दीपिकाने मरण्यापूर्वी रविवारी सकाळीच तिच्या वडिलांना फोन करून रडत रडत मारहाणीची कल्पना दिली होती. सासरच्यांनी तिने आत्महत्या केल्याचा दावा केला असला, तरी वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करत वकील असलेल्या पतीला आणि शाळा चालक ससऱ्याला तात्काळ अटक केली आहे.

2. भोपाळ: अभिनेत्री ट्विशा शर्माची 'डेथ मिस्ट्री'
तामिळ चित्रपटांमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून काम केलेल्या 33 वर्षीय ट्विशा शर्मा हिचा भोपाळमधील बागमुगालिया एक्सटेंशन येथील सासरी 12 मे च्या रात्री गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर तिने 9 डिसेंबर 2025 रोजी वकील समर्थ सिंग याच्याशी लग्न केले होते. तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून एक मोठा खुलासा झाला असून, तिच्या डोक्यावर, कानावर आणि हातावर मृत्यूच्या आधी ठोस वस्तूने मारल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे ही हत्या असल्याचे संकेत मिळत आहेत. मृत्यूपूर्वी ट्विशाने तिच्या आईला व्हॉट्सॲप मेसेज करून "माझे जीवन नरक बनले आहे" असे लिहिले होते. सध्या या प्रकरणात ट्विशाच्या पतीची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली असून, तिची सासू (सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश) हिला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दरम्यान, दिल्लीत तिच्या नातेवाईकांनी सीबीआय (CBI) चौकशीसाठी जंतर-मंतरवर निदर्शने केली असून, वडील एम्स दिल्लीत पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा – Twisha Sharma Case: ‘मला गुदमरल्यासारखं होतंय आई…’; सततचा संशय, हुंड्यासाठी दबाव, निवृत्त न्यायाधीशांच्या दोन महिन्यांच्या गर्भवती सुनेने संपवलं आयुष्य

3. कर्नाटक: हुंड्याला कंटाळून डॉक्टरची पत्नी ऐश्वर्या हिची आत्महत्या
कर्नाटकच्या बल्लारी जिल्ह्यातील कम्पली गावात 24 वर्षांच्या ऐश्वर्या नावाच्या नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. ऐश्वर्याचा प्रदीप कुमार नावाच्या एका सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरसोबत (Veterinary Doctor) प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पती प्रदीप आणि तिच्या सासूने अतिरिक्त हुंड्याची मागणी करत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या आईकडून होणाऱ्या या छळात पतीने पत्नीची साथ न दिल्यामुळे हताश झालेली ऐश्वर्या शेवटी आपल्या माहेरी परतली. सासरच्या जाचाला कंटाळून तिने अखेर घरात गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये सासरच्या छळाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. कम्पली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पती डॉक्टर प्रदीप आणि त्याच्या आईला बेड्या ठोकल्या आहेत.

हुंडा प्रथेचे बदललेले स्वरूप आणि सामाजिक वास्तव
आताच्या काळात हुंड्याच्या समस्येने उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंबांमध्ये भयंकर रूप धारण केले आहे. उच्चशिक्षित पती, श्रीमंत सासरचे लोक अशा प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये हुंड्याची हाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. वधूपक्षाकडून लग्नात दिल्या जाणाऱ्या महागड्या गाड्या, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचे उघडपणे कौतुक केले जाते, जे या प्रथेला सामाजिक मान्यता देण्याचे काम करते. जोपर्यंत समाज अशा 'भेटवस्तू' देण्याच्या पद्धतीवर बहिष्कार टाकत नाही आणि कायदे अधिक कडक होत नाहीत, तोपर्यंत दीपिका, ट्विशा आणि ऐश्वर्या सारख्या निष्पाप मुली या क्रूर प्रथेचा बळी ठरत राहतील, हे या समाजाचे अत्यंत भीषण पण सत्य वास्तव आहे.

हेही वाचा – NEET Paper Leak: 25 वर्षांचा अनुभव आणि भन्नाट स्मरणशक्ती; ‘नीट’ प्रकरणात मनीषा मांढरेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version