Solapur: पाऊस पडावा म्हणून चक्क गाढवाचं लग्न; सोलापूरात ग्रामस्थांनी वरुणराजाला घातलं अनोखं साकडं

सोलापूरच्या माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये पाऊस पडावा म्हणून ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने गाढवाचं लग्न लावलं. शेतकरी आणि जनावरांच्या पाण्यासाठी देवाला साकडं घालण्यात आलं.

Solapur: पाऊस पडावा म्हणून चक्क गाढवाचं लग्न; सोलापूरात ग्रामस्थांनी वरुणराजाला घातलं अनोखं साकडं

सोलापूर : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत माढा तालुक्यातील मोडनिंब ग्रामस्थांनी पावसासाठी एक अनोखी आणि पारंपरिक पद्धत अवलंबली. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गाढवाचं लग्न लावून देवाकडे पावसासाठी साकडं घालण्यात आलं.

पूर्वी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली की गाढवाचं लग्न लावण्याची प्रथा अनेक गावांमध्ये होती. लोकविश्वासानुसार अशा विधीनंतर पाऊस पडतो, अशी धारणा आहे. त्याच परंपरेला उजाळा देत मोडनिंबमधील ग्रामस्थांनी विधिवत गाढवांचं लग्न लावलं. हळद, हार, पूजा आणि मंगलाष्टकांच्या गजरात हा अनोखा सोहळा पार पडला.

या विवाहसोहळ्याला गावातील महिला, पुरुष आणि लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली. पारंपरिक वेशभूषेत ग्रामस्थांनी हा विधी पार पाडत “शेतकऱ्यांना दिलासा दे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय कर आणि लवकरात लवकर पाऊस पाड,” अशी प्रार्थना केली.

यंदा सोलापूर जिल्ह्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. अनेक भागांतील शेतकरी पेरणीनंतर पिकांच्या वाढीबाबत चिंतेत आहेत. विहिरी, तलाव आणि ओढ्यांतील पाणीही कमी होत असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी श्रद्धा आणि परंपरेच्या माध्यमातून पावसासाठी देवाला साकडं घालण्याचा निर्णय घेतला.

गाढवाचं लग्न हा केवळ लोकविश्वास नसून ग्रामीण संस्कृतीचा एक वेगळा पैलू असल्याचं ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. अशा परंपरा गावकऱ्यांना एकत्र आणतात आणि संकटाच्या काळात आशेचा आधार देतात, असंही त्यांचं मत आहे.

दरम्यान, मोडनिंबमधील हा अनोखा विवाहसोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या परंपरेमुळे अनेक नागरिकांनी उत्सुकतेने हा सोहळा पाहिला. आता गावकऱ्यांची नजर आकाशाकडे लागली असून, “गाढवाचं लग्न झालं, आता तरी वरुणराजा बरसावा,” अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number