Donald Trump Photo on American Passport : अमेरिकेच्या स्वातंत्र्यघोषणेला या जुलैमध्ये 250 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाने एक आतापर्यंतच्या इतिहासात अजब ठरणारा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विद्यमान राष्ट्राध्यक्षाचा फोटो पासपोर्टवर छापला जाणार आहे. ट्रम्प यांनी आता स्वतःचं ब्रँडिंग करण्यासाठी आणि मोठेपणा मिरवण्यासाठी नवीन प्रकार सुरू केल्याचं दिसत आहे. याआधी ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी थयथयाट केला होता. त्यानंतर स्वतःला काही दिवसांपूर्वीच येशू ख्रिस्ताच्या रुपात दाखवणारा AI फोटो पोस्ट केला होता. त्याच वेळी व्हॅटिकन सिटीतील पोपविषयी उलट-सुलट वक्तव्ये केली होती. याशिवाय, ते वेगवेगळ्या विषयांवर 'वाचाळता' करतच असतात. आता यात नवीन प्रकाराची भर पडली आहे. मात्र, या वेळेस थेट देशाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याचे दिसत आहे.
विशेष रचना आणि वैशिष्ट्ये
अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने (State Department) जाहीर केलेल्या या 'मर्यादित आवृत्ती' (Limited Edition) पासपोर्टवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र पाहायला मिळणार आहे. या नवीन पासपोर्टची रचना अतिशय भव्य आणि वेगळी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या मूळ ‘स्वातंत्र्य घोषणापत्रा’च्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा अधिकृत फोटो यामध्ये समाविष्ट असेल. विशेष म्हणजे, ट्रम्प यांची स्वाक्षरी यावर सोनेरी अक्षरात कोरलेली आहे. या पासपोर्टमध्ये केवळ ट्रम्प यांचाच फोटो नसून, अमेरिकेच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या 'फाउंडिंग फादर्स' यांचेही ऐतिहासिक चित्र पाहायला मिळणार आहे. देशाच्या गौरवशाली इतिहासाची आणि वर्तमानाची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले. लोकशाही परंपरांमध्ये राजकीय नेत्याचा फोटो पासपोर्टवर असणे ही दुर्मिळ घटना मानली जात असल्याने, या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे.
उपलब्धता आणि अटी
हे विशेष पासपोर्ट सरसकट सर्व नागरिकांना मिळणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे पासपोर्ट केवळ वॉशिंग्टन डी.सी. (Washington D.C.) येथील कार्यालयातूनच वितरित केले जातील. जोपर्यंत साठा उपलब्ध आहे, तोपर्यंतच 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर हे पासपोर्ट दिले जातील. यासाठी नागरिकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही. मात्र, एखाद्या प्रवाशाला हा फोटो असलेला पासपोर्ट नको असल्यास त्याला जुन्या स्वरूपाचा पासपोर्ट निवडता येईल का, याबाबत प्रशासनाने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.
ट्रम्प यांची 'ब्रँडिंग' मोहीम
दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी चिन्हे आणि संस्थांवर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा घाट घातला आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकन चलनी नोटांवर ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच वॉशिंग्टनमधील अनेक सरकारी इमारतींचे स्वरूप बदलले असून केनेडी सेंटरसारख्या संस्थांच्या नावांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये राजा चार्ल्स (तिसरे) यांचे फोटो नोटांवर असले तरी, ते केवळ औपचारिक प्रमुख आहेत. त्यामुळे अमेरिकेसारख्या लोकशाही असलेल्या आणि कार्यकारी राष्ट्राध्यक्ष असलेल्या देशात हा बदल मोठा मानला जात आहे.
जागतिक स्तरावर उमटलेले पडसाद
अमेरिकेच्या सध्याच्या पासपोर्टवर 'स्टॅचू ऑफ लिबर्टी' किंवा 'चंद्रावरील पहिले पाऊल' यांसारखी राष्ट्रीय अस्मितेची चिन्हे आहेत. राजकीय नेत्याचा फोटो पासपोर्टवर आणण्याच्या या निर्णयाला काही स्तरातून विरोधही होत आहे. दरम्यान, ब्रिटनचे राजा चार्ल्स सध्या वॉशिंग्टनच्या दौऱ्यावर असून त्यांनी मंगळवारी ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीतही अमेरिकेतील या नवीन बदलांची चर्चा झाल्याचे समजते. एका बाजूला स्वातंत्र्याची 250 वर्षे साजरी होत असताना, ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानास्पद, तर विरोधकांसाठी संतापाचा मुद्दा ठरला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.