मुंबई : मुंबई लोकल संबंधीत घडणाऱ्या दुर्घटना मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. आज पुन्हा एका लोकलमधील घटना समोर आली आहे. दिवा-मुंब्रा वळणावर सकाळच्या वेळेत एक महिला लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची मोठी घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 7.56 वाजताची गाडी वळणावर थांबली होती. त्याचवेळी महिला ट्रेनमधून खाली पडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला –
या घटनेबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी माहिती दिली की, चालत्या गाडीतून अशी घटना घडलेली नाही. गाडी जेव्हा थांबली होती. तेव्हा ही घटना घडली. महिलेची तब्येत देखील व्यवस्थित आहे. प्रवेशावर जेव्हा गाडी उभी असते तेव्हा फिजिकल फोर्स या देखील सतर्क असतात. कर्वेचर किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे ही महिला पडली का, याची देखील माहिती लोहमार्ग पोलीस घेत आहेत.