Petition against Dhurandhar 2 in Madras High Court : बॉक्स ऑफिसवर सध्या 'धुरंधर 2' या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत थेट उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी खेचण्यासाठी सज्ज असलेल्या 'धुरंधर 2' च्या निर्मात्यांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
तमिळनाडूतील राजकीय वातावरणात धुरंधर 2 या चित्रपटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तमिळनाडूमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे. अशा वातावरणात 'धुरंधर 2' प्रदर्शित करणे म्हणजे नियमांना पायदळी तुडवण्यासारखे आहे, असा दावा अॅडव्होकेट शीला यांनी मद्रास उच्च न्यायालयात केला आहे. या याचिकेनुसार, चित्रपटातील संवाद आणि कथानक एका विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करणारे असून, ते मतदारांच्या मनावर प्रभाव टाकू शकतात. मुख्य न्यायमूर्ती एस. ए. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती जी. अरुल मुरुगन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची तातडीची सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
राजकीय प्रोपोगंडा सेट करण्याचा दावा
याचिकाकर्त्यांच्या मते, निवडणुका होईपर्यंत कोणताही राजकीय प्रोपोगंडा सेट करण्यासाठी सिनेमाचा वापर होऊ नये. 'धुरंधर 2' मध्ये राजकीय आशय असून तो मतदारांना आकर्षित करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचे याचिकेत म्हटले आहे. निवडणुकीच्या निष्पक्षतेवर याचा परिणाम होऊ शकतो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट निवडणुका पूर्ण झाल्यावरच प्रदर्शित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे.
निर्मात्यांसमोर मोठा पेच आणि आर्थिक फटका
मद्रास उच्च न्यायालय आता यावर काय निकाल देणार, याकडे केवळ सिनेसृष्टीचेच नव्हे तर तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. जर न्यायालयाने या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवर स्थगिती दिली, तर प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडू शकते. याचा थेट फटका चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी इतके उत्सुक आहेत की, थिएटरमध्ये बंदी आल्यास मोबाईलवर पायरेटेड आवृत्ती मिळेल का, याचीही शोधमोहीम सुरू झाली आहे. यादरम्यान, चित्रपटावर बंदी घातली जाणार की अटींसह प्रदर्शनास परवानगी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तोपर्यंत 'धुरंधर 2' ची टीम आणि चाहते दोन्ही चिंतेत असून, न्यायालयाचा निकाल या चित्रपटाचे भवितव्य ठरवणार आहे.
हेही वाचा – Dhurandhar 2 : धुरंधर 2 ठरला बॉलीवूडमध्ये सर्वाधिक ओपनिंग वीकेंड कमाई करणारा चित्रपट
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.