मुस्लिम जोडप्यांचे ‘फस्ख-ए-निकाह’ करण्यासह बेकायदेशीर कारवायांचा ठपका; धर्मादाय उपायुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश

मुंबई : मुस्लिम जोडप्यांचे ‘फस्ख-ए-निकाह’ (विवाह विच्छेद) करण्यासह धर्मादाय स्वरूपात न मोडणाऱ्या विविध कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत मुंबईतील ‘मोहक्कमा-ए-शरिया दारुल कझा रहमानिया’ या सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश बृहन्मुंबई विभागाचे धर्मादाय उपायुक्त डॉ. राहुल जे. चव्हाण यांनी दिला आहे. या ट्रस्टला यापुढे ट्रस्टच्या नावाने कोणतीही गतिविधी करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. हा […]

मुस्लिम जोडप्यांचे ‘फस्ख-ए-निकाह’ करण्यासह बेकायदेशीर कारवायांचा ठपका; धर्मादाय उपायुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश

मुंबई : मुस्लिम जोडप्यांचे ‘फस्ख-ए-निकाह’ (विवाह विच्छेद) करण्यासह धर्मादाय स्वरूपात न मोडणाऱ्या विविध कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत मुंबईतील ‘मोहक्कमा-ए-शरिया दारुल कझा रहमानिया’ या सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश बृहन्मुंबई विभागाचे धर्मादाय उपायुक्त डॉ. राहुल जे. चव्हाण यांनी दिला आहे. या ट्रस्टला यापुढे ट्रस्टच्या नावाने कोणतीही गतिविधी करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश 13 ऑगस्ट 2026 रोजी देण्यात आला.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 च्या कलम 22(3ए)(ई) अंतर्गत रिजवाना अफजल शेख यांनी ट्रस्टची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. ‘मोहक्कमा-ए-शरिया दारुल कझा रहमानिया’ या संस्थेची पीटीआर नोंदणी F-46795 (मुंबई) या क्रमांकाने झाली होती.

या प्रकरणात धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकांनी केलेल्या चौकशीचे अहवाल, उपलब्ध कागदपत्रे आणि तक्रारदारांची प्रतिज्ञापत्रे विचारात घेण्यात आली. आदेशात नमूद केल्यानुसार, संबंधित ट्रस्ट धर्मादाय स्वरूपात न मोडणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे चौकशीत आढळले. विशेषतः मुस्लिम जोडप्यांचे ‘फस्ख-ए-निकाह’ करण्यासारख्या कारवायांचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. तसेच चौकशीदरम्यान वारंवार बोलावूनही विश्वस्त प्राधिकरणासमोर उपस्थित राहिले नाहीत, योग्य पुरावे व कागदपत्रे सादर करण्यात ते अपयशी ठरले आणि आवश्यक लेखापरीक्षण अहवाल तसेच बदल अहवाल वेळोवेळी सादर केले नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

धर्मादाय उपायुक्तांनी आदेशात म्हटले आहे की, चौकशी अहवाल, उपलब्ध कागदपत्रे आणि तक्रारदारांची प्रतिज्ञापत्रे यांचा एकत्रित विचार करता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ट्रस्टची नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. अशा कारवायांचा महिलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संबंधित विश्वस्तांविरुद्ध कठोर कारवाई आवश्यक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महिनाभरात मूळ नोंदणी प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश

धर्मादाय उपायुक्तांनी विविध अर्ज आणि चौकशीच्या प्रक्रियेनंतर Misc. Application No. DyCC/712/2026 मंजूर करून ट्रस्टची नोंदणी रद्द केली. ट्रस्टच्या विश्वस्तांना मूळ ट्रस्ट नोंदणी प्रमाणपत्रासह संबंधित मूळ कागदपत्रे आदेशाच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभागाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

इतकेच नव्हे तर यापुढे ‘मोहक्कमा-ए-शरिया दारुल कझा रहमानिया’ या ट्रस्टच्या नावाखाली कोणतीही गतिविधी करण्यास विश्वस्तांना स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे. भविष्यात या ट्रस्टची कोणतीही मालमत्ता आढळल्यास ती जप्त करून त्यातून मिळणारी रक्कम धर्मादाय कार्यालयाच्या पी.टी.ए. फंडात जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

2012पासून सुरू होता कायदेशीर वाद

या ट्रस्टची नोंदणी 6 डिसेंबर 2012 रोजी करण्यात आली होती. या नोंदणीला रिजवाना अफजल शेख यांनी संयुक्त धर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. त्यानंतर 11 ऑगस्ट 2023 रोजी आधीचा आदेश रद्द करून प्रकरण नव्याने चौकशीसाठी पाठविण्यात आले होते. बशीर अहमद इब्राहिम उल्डे यांनीही ट्रस्टच्या नोंदणीविरोधात कायदेशीर कार्यवाही केली होती.

यापूर्वी ट्रस्टच्या उद्दिष्टांमध्ये असलेल्या ‘फस्ख-ए-निकाह’च्या तरतुदीवरही आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात विविध स्तरांवर चौकशी, अपील आणि फेरचौकशी झाली. संयुक्त धर्मादाय आयुक्तांनीही नव्याने चौकशी करून संबंधित पक्षांना पुरेशी संधी देण्याचे निर्देश दिले होते.

अखेरीस सर्व चौकशी अहवाल आणि कागदपत्रांचा विचार करून धर्मादाय उपायुक्त डॉ. राहुल जे. चव्हाण यांनी 13 ऑगस्ट 2026 रोजी ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याचा अंतिम आदेश दिला. या आदेशाची नोंद ट्रस्टच्या शेड्यूल-I मध्ये घेण्यासह सर्व संबंधित पक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे संयुक्त धर्मादाय आयुक्त-II यांना आदेशाची माहिती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number