T20 World Cup 2026: महिला T20 वर्ल्ड कप 2026 मधील हाय-व्होल्टेज सामन्यात भारताचा सामना त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. या हाय-प्रोफाइल लढतीत भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माकडे एक नवा इतिहास रचण्याची आणि गोलंदाजीत अव्वल स्थान पटकावण्याची सुवर्णसंधी असेल.
निदा डार आणि एकता बिष्ट यांचा रेकॉर्ड धोक्यात
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान संयुक्तपणे भारताच्या एकता बिष्ट आणि पाकिस्तानच्या निदा डार यांच्या नावावर आहे. या दोन्ही गोलंदाजांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 10 विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात दमदार कामगिरी करत दीप्तीला या दोघींनाही मागे टाकण्याची उत्तम संधी आहे.
सना मीरला मागे सारत दीप्तीची आगेकूच
दीप्ती शर्माने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 7 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू सना मीरच्या नावावरही 9 विकेट्स आहेत, परंतु तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. त्यामुळे या यादीत थेट अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी आता केवळ दीप्तीकडेच आहे.
अवघ्या 2 विकेट्स आणि नवा इतिहास
या ऐतिहासिक सामन्यात दीप्तीने आणखी 2 विकेट्स घेताच, ती भारत-पाकिस्तान T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी जगातील नंबर 1 गोलंदाज बनेल. आता या महत्त्वाच्या सामन्यात दीप्ती आपली फिरकीची जादू दाखवून हा महाविक्रम आपल्या नावावर करणार का, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.