MSBSHSE Board Exam: फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांपूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्ज स्विकारण्याबाबत नवी धोरणे जाहीर केली आहेत. यानुसार, परीक्षेपूर्वी केवळ 20 दिवसांपर्यंतच विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पूर्वी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंतही अर्ज भरता येत असल्याने प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहत होती, मात्र आता ही लवचिकता संपुष्टात आली आहे.
अर्ज स्वीकृतीसाठी नवी अंतिम मुदत
बारावीचे अर्ज: 21 जानेवारी 2026 पर्यंत
दहावीचे अर्ज: 30 जानेवारी 2026 पर्यंत
मंडळाने अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्कांसाठी स्वतंत्र वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. सध्या दहावीचे अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, 30 जानेवारी ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. परीक्षांना अवघे काही दिवस उरले असताना हा निर्णय जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. अनेक शाळांना नवीन नियमांची अंमलबजावणी तातडीने करावी लागणार आहे.
शेवटच्या क्षणी होणाऱ्या गोंधळाला आळा
अधिकारी सूत्रांच्या माहितीनुसार, विभागीय मंडळांकडून अर्ज स्वीकृतीच्या मुदतीबाबत बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून येत होती. परीक्षेच्या अगदी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येत असल्यामुळे केंद्रांवरील विद्यार्थ्यांची नेमकी संख्या निश्चित करणे अवघड होत होते. तसेच प्रश्नपत्रिका, आसनव्यवस्था आणि व्यवस्थापकीय नियोजन करण्यास अडथळे निर्माण होत असे. तथापी, नवीन नियमामुळे अर्जांची संख्या निश्चित समजण्यास मदत होईल आणि नियोजन सुलभ होईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Maharashtra Teacher Protest: शिक्षकांचा राज्यव्यापी बंद! टीईटी सक्ती रद्द करण्याची मागणी ठाम
शुल्क संरचनेबाबत सविस्तर मार्गदर्शक तक्ता
मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी विविध प्रकारच्या विलंब शुल्काचा तक्ता विभागीय कार्यालयांना पाठवला आहे. कोणत्या तारखेला किती शुल्क लागू होणार याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या या निर्णयामुळे परीक्षा व्यवस्थापनात शिस्तबद्धता येईल, असे अधिकारी सांगत आहेत; मात्र विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.