Dahi Handi 2026: दहीहंडी उत्सवाला गालबोट! मुंबईत हंडी फोडताना 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

मुंबईतील मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले. हंडी बांधलेला खांब कोसळून सात वर्षीय रुद्र कदमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Dahi Handi 2026: दहीहंडी उत्सवाला गालबोट! मुंबईत हंडी फोडताना 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

मुंबई : दहीहंडीच्या उत्साहात मुंबईकर जल्लोष करत असतानाच मालाडच्या मालवणी परिसरातून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. दहीहंडीचा उत्सव साजरा करत असताना हंडी बांधण्यासाठी वापरण्यात आलेला खांब अचानक कोसळला. या दुर्घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अवघ्या सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. रुद्र कदम असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरातील मार्वे रोडवरील चिकुवाडी येथील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये शनिवारी मुलांनी दहीकाला उत्सवाचे आयोजन केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरातील चिमुकले दहीहंडीचा आनंद घेण्यासाठी एकत्र आले होते. मात्र, उत्सव सुरू असतानाच अचानक घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली.

दहीहंडी फोडण्यासाठी मुलांनी एका झाडाला आणि इमारतीच्या तळमजल्यावरील खांबाला दोर बांधला होता. हंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच संबंधित खांब अचानक कोसळला. यावेळी जवळच असलेल्या रुद्रच्या डोक्याला खांबाचा जोरदार मार लागला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

रुद्रला गंभीर अवस्थेत तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. त्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दहीहंडीचा उत्सव म्हणजे मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो. मोठ्या गोविंदा पथकांपासून ते सोसायट्यांमधील चिमुकल्यांच्या छोट्या दहीहंडीपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मात्र, मालवणीतील या घटनेने उत्सवाच्या काळात सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हंडी बांधण्यासाठी वापरण्यात आलेली रचना, दोर आणि खांब सुरक्षित आहेत का, तसेच उत्सवादरम्यान मुलांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली जात आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः लहान मुलांकडून अशा प्रकारचे आयोजन केले जात असताना पालक आणि आयोजकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number