तुम्हाला ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ माहीत असेल, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ माहीत असेल. पण तुम्ही कधी ‘एंटरन्टेमेंट बँक ऑफ इंडिया’ या बँकेचं नाव ऐकलंय का? नाही ना! पण एका दांपत्याने चक्क ‘एंटरन्टेमेंट बँक ऑफ इंडिया’ च्या नोटा देऊन सराफाला लुटलंय.
हा विचित्र चोरीचा प्रकार पंजाबमध्ये घडलाय. पंजाबच्या जलंदरमध्ये एका दांपत्याने सोन्याच्या दुकानात १ लाख ९० हजाराच्या बनावट नोटा देऊन सराफाला फसवलंय.
काय घडलंय नेमकं?
जलंदरमध्ये एक दांपत्या सोने खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकानात गेलं. त्यावेळी या दांपत्याने ‘एंटरन्टेमेंट बँक ऑफ इंडिया’ या नावाच्या खोट्या नोटा दुकांदाराला दिल्या. हे जोडपं दुकानातून निघून गेल्यावर ही बाब सराफाच्या लक्षात आली आणि त्याला धक्काच बसला. श्याम सुंदर वर्मा असं त्या सराफाचं नाव आहे.
वर्मा यांनी दिलेल्या माहितीनूसार एक दांपत्य़ सोन्याची खरेदी करण्यासाठी त्याच्या दुकानात आलं होतं. सगळी खरेदी करुन त्यांचं बिल १ लाख ९० हजार झालं. त्यावेळी त्या दांपत्य़ाने सगळे पैसे कॅशमध्ये दिले. सगळं बिल भरून ते तिथून गडबडीत निघून गेले. दांपत्य़ एवढ्या गडबडीत बाहेर पडल्यामुळे वर्मा यांना शंका आली. म्हणून त्यांनी लगेच नोटा तपासल्या. त्यावेळी लक्षात आलं की, त्य़ा बनावट नोटा होत्या.
त्या नोटांवर ‘रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या जागी ‘एंटरन्टेमेंट बँक ऑफ इंडिया’ असं लिहिलं होतं. हा प्रकार घडल्यानंतर वर्मा यांनी जोधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही सगळा घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पाहिलं तेव्हा हे समोर आलं की, हे दांपत्य चारचाकी गाडीतून आलं होतं. आणि त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. या सगळ्या प्रकारचा पोलीस तपास करत आहेत.