अकोल्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पारस गावात मंदिरावर लिंबाचं झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून २० ते २५ भाविक जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या आहेत. तर, अकोला दुर्घटनेबाबत फडणवीसांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. अकोल्याची घटना दुर्देवी असून जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, मृतांच्या वारसाला शासनाकडून चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील पारस येथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला. हे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी तातडीने जखमींवर वेळेत उपचार व्हावेत म्हणून ते समन्वय ठेवून आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत दिली. तसेच, या दुर्घटनेतील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1645107522297294848?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1645107522297294848%7Ctwgr%5Ebe787e9d912fbc745ca249ae177308d55f35e737%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fakola%2Fsaddened-by-the-news-of-the-akola-tragedy-fadnavis-expressed-his-condolences-on-twitter-a-a601%2F
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गाव रविवारी हादरले आहे. पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी भाविकांची गर्दी असते. रविवारी सायंकाळच्या सुमारास मंदिरात आरती झाली. त्याचदरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावासाला सुरुवात झाली. त्यामुळे मंदिराच्या बाहेर असलेल्या भाविकांनी मंदिरात असलेल्या शेडचा सहारा घेतला. त्याचवेळी मंदिरासमोरील झाड शेडवर कोसळल आणि मोठी दुर्घटना घडली. ही दुर्घटना घडताच प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. मात्र, सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे बचाव कार्यासाठी अडथळा येत होता.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बाहेर असलेल्या नागरिकांनी मंदिराच्या शेडचा सहारा घेतला. त्याचवेळी मंदिरासमोरील लिंबाचं झाड शेडवर कोसळलं. आणि शेडही कोसळंल. या दुर्घटनेत ७ भाविकांचा मृत्यू झाला तर २९ भाविक जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील सर्व २९ जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.