भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात 10 शाळकरी मुलांना पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावे घेऊन जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. परिसरातील अनसार नगर खंडू पाडा पटेल नगर येथे ही घटना घडली आहे. त्यामुळे महापालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणेने या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.
अहमद महेनूर खान, अब्दुल हसन रब्बानी अन्सारी या शाळकरी मुलांसह इतर मुलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन त्यांना जखमी केलं आहे.
त्यापैकी मुलीच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर कुत्रा चावल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत.
या सर्वांना प्रथम भिवंडी शहरातील उपजिल्हा रुग्णालय ‘स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय’ येथे उपचार करण्यात आले होते.
मात्र यातील दोन मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाणे शासकीय रुग्णालय आणि मुंबईला हलवण्यात आलं आहे.
त्या मुलांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे.
या भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याकडून भिवंडी शहरात भीती निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेकडून या पिसाळलेल्या कुत्र्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
यासंबंधी भिवंडी आयुक्त प्रवीण अष्टीकर यांची प्रतिक्रिया ‘जय महाराष्ट्र’ने घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यासंबंधी बोलण्यास नकार दिला.