छत्रपती संभाजीनगर : बहिणीशी लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या रागातून मेडिकल चालकाची दुकानात घुसून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फैसल कादर शेख असे मृत मेडिकल चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेहान अमीन पटेल आणि समीर रईस शेख या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्सूल परिसरातील पटेल लॉन्सजवळील आयशा मंजिल भागात फैसल शेख यांचे लाइफलाइन मेडिकल शॉप आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपी रेहान याच्यासाठी फैसल यांच्या बहिणीचे स्थळ आले होते. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे या लग्नाच्या प्रस्तावाला नकार देण्यात आला होता. त्यानंतर रेहान हा फैसल आणि त्यांच्या कुटुंबीयांवर नाराज असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
दरम्यान, लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून आरोपीकडून फैसल यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. आरोपी मेडिकल दुकान तसेच घराच्या परिसरातून बुलेटवरून मोठा आवाज करत जात असल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासून वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याच पार्श्वभूमीवर काल दुपारी रेहान हा त्याच्या साथीदारांसह लाइफलाइन मेडिकलमध्ये गेला. दुकानात गेल्यानंतर फैसल आणि आरोपींमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर रेहानने फैसल यांच्या पोटात चाकूने वार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात फैसल गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आणि संबंधितांनी फैसल यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
दरम्यान, या प्रकरणी रेहान अमीन पटेल आणि समीर रईस शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येमागे नेमका कोणता वाद होता, हल्ल्याच्या वेळी आणखी कोणी सहभागी होते का आणि घटनेमागील इतर कारणे काय आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे हर्सूल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुढील तपास सुरू आहे.