छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगर प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आई, वडील आणि मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या घटनेमागील नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे. सुरुवातीला या प्रकरणात आयफोनचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, आता कुणालच्या मित्राने केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
कुणालला आयफोन हवा होता आणि त्यासाठी तो नाराज होता, अशी चर्चा सुरुवातीला समोर आली होती. मात्र, कुणालच्या जवळच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, ही माहिती पूर्ण चित्र सांगणारी नाही. कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता आणि काही दिवसांपूर्वी त्याने नवीन फोन घेतला होता, असं त्याच्या मित्राने सांगितलं आहे.
घटनेच्या दिवशीही दुकानात गेला होता कुणाल
कुणालच्या दुकानदार मित्राने सांगितलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशीही कुणाल नेहमीप्रमाणे दुकानात आला होता. त्याने दूध आणि काही घरगुती वस्तू घेतल्या. त्यावेळी त्याच्या वागण्यात काही वेगळं जाणवलं नसल्याचं मित्राचं म्हणणं आहे.
मात्र, त्याच दिवशी सोशल मीडियावर कुणालने केलेल्या एका पोस्टमुळे या प्रकरणात नवा प्रश्न निर्माण झाला आहे. मित्राच्या दाव्यानुसार, सकाळी Instagram वरील Notes या फीचरमध्ये कुणालने इंग्रजीत 'I Am Sorry Everyone' असं लिहिलं होतं.
ही नोट त्याच्या Instagram वरील मित्रांना दिसत होती. मात्र, दिवसभर व्यस्त असल्यामुळे आपल्याला ती त्याच वेळी पाहता आली नाही. संध्याकाळी नोट पाहिल्यानंतर आणि त्यानंतरची घटना समजल्यानंतर या दोन्ही गोष्टींचा संबंध लक्षात आल्याचं मित्राने सांगितलं.
कुणालच्या अभ्यासाबाबतही समोर आली माहिती
कुणाल अभ्यासात हुशार होता, अशी माहिती त्याच्या काकांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याला ९५ टक्के गुण मिळाले होते. पुढे वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या उद्देशाने तो नीट परीक्षेची तयारी करत होता.
त्याच्या शिक्षणासाठी कुटुंबाने मोठा खर्चही केला होता. नीटच्या तयारीसाठी कोचिंगवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे कुणालच्या भविष्यासाठी कुटुंबीयांनी मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या.
कुटुंबात पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होत होते, अशी माहितीही नातेवाईकांनी दिली आहे. मात्र हे वाद अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते, असं स्पष्टपणे सांगता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कौटुंबिक वातावरणाचा कुणालच्या मानसिक अवस्थेवर नेमका किती परिणाम झाला, हा तपासाचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.