छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या संचालकांच्या मुलीचा फोटो WhatsApp च्या DP वर ठेवून अकाउंटंटचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर कंपनीच्या बँक खात्यांची माहिती आणि रकमेचे स्क्रीनशॉट मागवून अवघ्या दीड तासाच्या कालावधीत तब्बल 3 कोटी 70 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. हा प्रकार गारखेडा परिसरातील आदित्यनगरात घडल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इन्फ्रा कंपनीत 42 वर्षीय दिगंबर माने हे अकाउंटंट म्हणून काम करतात. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र WhatsApp ग्रुप तयार करण्यात आला होता. कंपनीचे संचालक कामानिमित्त बाहेरगावी असल्याने काही स्वाक्षरी केलेले धनादेश, स्लिप आणि RTGS फॉर्मही उपलब्ध होते. याच परिस्थितीचा फायदा सायबर ठगांनी घेतल्याचा संशय आहे.
WhatsApp वर आला मेसेज
14 सप्टेंबर रोजी सकाळी अकाउंटंटच्या मोबाईलवर कंपनीच्या सर्व बँक खात्यांमध्ये किती रक्कम आहे, याची माहिती घेऊन स्क्रीनशॉट पाठवण्यास सांगणारा मेसेज आला. WhatsApp वरील DP वर कंपनीच्या संचालकांच्या मुलीचा फोटो असल्याने संबंधित मेसेज खरा असल्याचा अकाउंटंटचा समज झाला.
त्यानंतर अकाउंटंटने कंपनीच्या खात्यांमधील शिल्लक रकमेचे स्क्रीनशॉट पाठवले. पुढे त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. वरिष्ठांकडूनच आदेश आले आहेत, असा समज झाल्याने त्यांनी सांगितल्याप्रमाणे RTGS व्यवहार केले.
दोन खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये
पोलिसांच्या माहितीनुसार, एका खात्यात 1 कोटी 70 लाख रुपये तर दुसऱ्या खात्यात 2 कोटी रुपये पाठवण्यात आले. अशा प्रकारे एकूण 3 कोटी 70 लाख रुपयांचा व्यवहार झाला. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार अत्यंत कमी कालावधीत घडला.
पैसे ट्रान्सफर झाल्यानंतरही आणखी 2 कोटी रुपये पाठवण्याचा मेसेज अकाउंटंटला आला. मात्र, यावेळी त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधून पुढील RTGS व्यवहार थांबवण्याची विनंती केली. बँकेकडून संबंधित बँकेला ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली.
मालकाचा फोन आल्यानंतर फसवणूक उघड
यानंतर कंपनीच्या मालकाशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी अशा प्रकारचा कोणताही मेसेज पाठवला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे WhatsApp DP आणि बनावट मेसेजच्या माध्यमातून अकाउंटंटची फसवणूक झाल्याचे समोर आले.
घटनेनंतर अकाउंटंटने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन खातेधारकांसह एका मोबाईलधारकाविरोधातही तक्रार नोंदवण्यात आली असून, संबंधित व्यवहार आणि खात्यांची माहिती तपासली जात आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेतून केवळ WhatsApp DP किंवा नाव पाहून आर्थिक व्यवहारांच्या सूचना खऱ्या मानणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा समोर आले आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारांपूर्वी संबंधित व्यक्तीशी थेट फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करणे महत्त्वाचे ठरते.