Chandrashekhar Bawankule On Crop Inspection: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यातील प्रत्येक शेताची पीक पाहणी पूर्ण करावी. या पाहणीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक मूल्यमापन होऊन त्यांना वेळेत मदत पोहोचवणे शक्य होईल.
यापूर्वी शासनाने खरीप हंगामासाठी पीक पाहणीचे वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानुसार 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांकडून पाहणी अपेक्षित होती, तर 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर या काळात सहाय्यकांमार्फत उर्वरित शेतांची पाहणी करण्यात येणार होती. मात्र अतिवृष्टी आणि दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याने शासनाने आता अतिरिक्त एक महिन्याची मुदत दिली आहे. शेतकऱ्यांची मूळ पाहणीची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व शेतांची पाहणी 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी विशेष प्रशिक्षित सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली असून ते प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पिकांचे परीक्षण करतील. गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची देखील पीक पाहणी हाच पथक करून घेणार आहे.
१०० % पीक पाहणी होणार ! राज्य आपत्कालीन स्थितीतून जात असल्याने खरीप हंगाम २०२५ साठी पीकपाहणी करणे अत्यावश्यक आहे. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले,की आपल्या यंत्रणेमार्फत एक ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान प्रत्येक शेताची पाहणी व्हावी.@CMOMaharashtra#Maharashtra… pic.twitter.com/H2Nf2I15df — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 1, 2025
हेही वाचा – MHADA Housing Policy: म्हाडा घर विक्रीचा ‘तो’ नियम बदलणार? मोठ्या हालचाली सुरु
महसूल खात्याच्या परिपत्रकानुसार, सहाय्यकांनी केलेल्या प्रत्येक पाहणीची 100 टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच मंजूर पीक पाहणी 7/12 उताऱ्यावर नोंदवली जाईल. राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता ही पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 100 टक्के पीक पाहणी पूर्ण होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.