राज्याच्या काही भागांत पुढील चार दिवस पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये २५ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील आठवडय़ात राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे सावट ओसरले असून कमाल तापमानात साधारण चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती.
मात्र प्रत्यक्षात मंगळवारी सकाळी मुंबईत जोरदार पाऊस झाला. नंतर पुण्यात दाखल झालेल्या पावसाने दिवसभर शहराच्या विविध भागांमध्ये हजेरी लावली. सकाळपासून शहरात आकाश ढगाळ राहिले. राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता कायम आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल. धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.