पिंपरी-चिंचवड शहरात महामार्गावर वाहन उभे करून सोशल मीडिया रील बनवण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गानंतर आता चाकण MIDC परिसरातील महामार्गावर फॉर्च्युनर कार चालकाने भर रस्त्यात वाहन आडवे लावून रील बनवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन काही काळ वाहतूक कोंडी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण MIDC परिसरात एका फॉर्च्युनर कार चालकाने आपले वाहन महामार्गावर आडवे लावले. त्यानंतर कारच्या मदतीने महामार्गावर रील तयार करण्यात आली. या रीलसाठी रस्त्यावर वाहन थांबवल्याने इतर वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी निर्माण झाल्या. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.
महामार्गासारख्या वर्दळीच्या रस्त्यावर अशा पद्धतीने वाहन थांबवून व्हिडिओ किंवा रील तयार करणे इतर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकते. अचानक रस्त्यावर वाहन आडवे उभे राहिल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सोशल मीडियावरील काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वीही मुंबई-बंगळुरू महामार्गावरील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारची घटना समोर आली होती. एका कारचालकाने आपल्या नव्या कोऱ्या कारचा व्हिडिओ तयार करण्यासाठी भर महामार्गावर वाहनाचा वापर करत रील बनवली होती. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
आता पुन्हा चाकण MIDC परिसरात अशाच प्रकारची घटना समोर आल्याने वाहनचालकांच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यांचा वापर करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक पोलीस संबंधित फॉर्च्युनर चालकावर नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.