थोर समाजसुधारक संत गाडगे बाबांच्या १४७ व्या जयंती महोत्सवा निमिताने गाडगे महाराजांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काकड आरती आणि सामुदायिक ध्यान, दुपारी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी गाडगेबाबांचे हजारो अनुयायी श्रीक्षेत्र नागरवाडी मध्ये पोहचले आहेत. जयंतीनिमित्त परिसरातील हजारो गरजू आदिवासी बांधवांना अन्नदान करण्यात येणार आहे.
संत आणि समाजसुधारक, गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांना संत गाडगे बाबा म्हणूनही ओळखले जात असे. त्यांनी ग्रामीण भागात फिरून जातीपातीच्या सामाजिक आजाराविरुद्ध आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती केली.
‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ हा गाडगे महाराज यांचा मंत्र असे. गाडगे महाराज कधीही मंदिरात दर्शनासाठी गेले नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांनी कधी कोणाला आशीर्वादही दिला नाही. जर कोण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी चरणस्पर्ष करु लागले तर खाली वाकलेल्या व्यक्तीच्या पाठीत ते हातातील खराटा घालत. ते डोक्याला गाडग्याचे खापर आणि हातात खराटा हा गाडगे महाराज यांचा वेश असे. ते धर्मशाळेत, देवळात राहात. ते गावोगावी मजल दरमजल करत. मजल दरमजल करत असताना ते गावोगावी किर्तन करत. आपल्या किर्तनातून ते अंधश्रद्धा, जातीपाती आणि व्यसनांवर प्रहार करत.