CBI Arrested Lt Col Deepak Kumar Sharma: लेफ्टनंट कर्नलच्या घरावर सीबीआयचा छापा; 2.23 कोटींची रोकड जप्त आणि पत्नीवरही कारवाई

अटकेनंतर सीबीआयच्या पथकाने जेव्हा शर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची झडती घेतली, तेव्हा तिथले दृश्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले.
CBI Arrested Lt Col Deepak Kumar Sharma: लेफ्टनंट कर्नलच्या घरावर सीबीआयचा छापा; 2.23 कोटींची रोकड जप्त आणि पत्नीवरही कारवाई

CBI Arrested Lt Col Deepak Kumar Sharma : संरक्षण मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) केलेल्या धडक कारवाईमुळे संपूर्ण संरक्षण विभागात खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संरक्षण उत्पादन विभागात तैनात असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना सीबीआयने शनिवारी बेड्या ठोकल्या.

बंगळुरूमधील एका खासगी कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी 3 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या कारवाईत शर्मा यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. 18 डिसेंबर 2025 रोजी विनोद कुमार नामक व्यक्तीने ही लाचेची रक्कम शर्मा यांच्याकडे सुपूर्द केली होती. सीबीआयने या कारवाईत शर्मा यांच्यासह लाच देणाऱ्या विनोद कुमार यालाही अटक केली आहे.

घरात सापडला नोटांचा डोंगर
अटकेनंतर सीबीआयच्या पथकाने जेव्हा शर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची झडती घेतली, तेव्हा तिथले दृश्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले. शर्मा यांच्या घरातून तब्बल 2.23 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय, लाचेचे 3 लाख रुपये देखील हस्तगत करण्यात आले आहेत. संरक्षण साहित्याची निर्मिती आणि निर्यातीशी संबंधित खासगी कंपन्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी शर्मा हे गुन्हेगारी कट रचून भ्रष्ट कृत्ये करत असल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

हेही वाचा – Puran Kumar Death Case: IPS वाय पूरण कुमार मृत्यू प्रकरणाला नवे वळण; माजी DGP शत्रुजीत कपूर यांची SIT कडून चौकशी

पत्नी कर्नल काजल बाली यांच्यावरही गुन्हा दाखल
या भ्रष्टाचार प्रकरणात केवळ दीपक शर्माच नव्हे, तर त्यांची पत्नी कर्नल काजल बाली यादेखील तपास यंत्रणेच्या रडारवर आल्या आहेत. काजल बाली या राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील 16 इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. सीबीआयने श्रीगंगानगर येथील त्यांच्या निवासस्थानावरही छापा टाकला असून, तिथून 10 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या दाम्पत्याविरुद्ध सीबीआयने संगनमताने भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

खासगी कंपन्यांशी संशयास्पद साटेलोटे
सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव यादव आणि रवजीत सिंह नावाच्या व्यक्ती बंगळुरूमधील कंपनीचे कामकाज पाहत होते. हे दोघेही लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्या नियमित संपर्कात होते. सरकारी मंत्रालये आणि विभागांमधून आपल्या कंपनीला बेकायदेशीरपणे कंत्राटे किंवा सवलती मिळवून देण्यासाठी ते शर्मा यांचा वापर करत होते. या गैरव्यवहाराची गुप्त माहिती सीबीआयला मिळताच त्यांनी सापळा रचून ही मोठी कारवाई केली.

23 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी
अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी दीपक कुमार शर्मा आणि विनोद कुमार यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तपासाची गरज लक्षात घेऊन त्यांना 23 डिसेंबर 2025 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास आता अधिक सखोलपणे सुरू असून, यामध्ये संरक्षण दलातील आणखी काही मोठी नावे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Four Mothers Arrested : '..मुलांवर चांगले संस्कार केले नाहीत? मग तुम्हीच खरे दोषी'; छेड काढणाऱ्या 4 अल्पवयीन मुलांच्या मातांना ठोकल्या बेड्या..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version