Buldhana: धक्कादायक! ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त शाळेत शिक्षकच दीड वर्षांपासून गैरहजर; पगार मात्र सुरळीत

ते शाळेत प्रत्यक्ष अध्यापन करत नसतानाही त्यांचा पगार मात्र सुरळीत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Buldhana: धक्कादायक! ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कारप्राप्त शाळेत शिक्षकच दीड वर्षांपासून गैरहजर; पगार मात्र सुरळीत

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या चिखली तालुक्यातील भोकर येथील जिल्हा परिषद शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेतील बाळू गव्हाणे हे शिक्षक मागील एक ते दीड वर्षांपासून शाळेत नियमितपणे उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ते शाळेत प्रत्यक्ष अध्यापन करत नसतानाही त्यांचा पगार मात्र सुरळीत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

बाळू गव्हाणे हे इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकवतात. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ते या वर्गांवर अध्यापनासाठी गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गणित आणि विज्ञान विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शाळेतील काही विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक कोण आहेत, याचीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकाचे नाव विचारले असता ते इतर शिक्षकांचे नाव सांगत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाळू गव्हाणे हे प्रत्येक वेळी ‘कार्यालयीन कामकाज’ असल्याचे कारण देत शिक्षण अधिकाऱ्यांकडून आदेश काढून घेतात आणि त्यानंतर शाळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाच्या नावाखाली शिक्षकाला सातत्याने शाळेपासून दूर ठेवण्यामागे नेमके काय कारण आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

एका बाजूला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असताना दुसऱ्या बाजूला संबंधित शिक्षकाचा पगार नियमित सुरू असल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती घेऊन अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शिक्षकावर काय कारवाई करतो, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी काय उपाययोजना करतो, याकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number