बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर बेसबॉल स्टिकने हल्ला केल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.प्राथमिक माहितीनुसार, गोपालनगर परिसरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका घरातून जोरदार भांडण आणि आरडाओरड ऐकू आल्याने शेजारी घटनास्थळी धावले. नागरिकांनी नेमके काय घडले, अशी विचारणा केली असता आरोपीने पत्नीबाबत संशय व्यक्त करत धक्कादायक कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. जखमी महिलेबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण, कौटुंबिक वादाचे स्वरूप आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे खामगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.