Buldhana Doctor Death: बुलढाण्यात डॉक्टरचा मृत्यू; राजीनाम्यानंतर काहीच वेळात उचललं टोकाचं पाऊल, कामाचा ताण की काही वेगळंच कारण?

बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात डॉक्टरचा मृत्यू झाला. NQAS मूल्यांकनाच्या तयारीचा कामाचा ताण आणि प्रशासकीय दबाव असल्याचा डॉक्टर संघटनेचा आरोप असून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Buldhana Doctor Death: बुलढाण्यात डॉक्टरचा मृत्यू; राजीनाम्यानंतर काहीच वेळात उचललं टोकाचं पाऊल, कामाचा ताण की काही वेगळंच कारण?

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एका डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मांडवा उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. संदीप प्रकाशराव हाडे (वय 37) यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, डॉक्टर संघटनेने त्यांच्या आत्महत्येमागे कामाचा प्रचंड ताण आणि प्रशासकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

डॉ. हाडे हे मांडवा उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येपूर्वी काही दिवसांपासून त्यांच्यावर NQAS मूल्यांकनाच्या तयारीचा मोठा ताण असल्याची माहिती आरोग्य अधिकारी संघटनेने दिली आहे. अवघ्या चार-पाच दिवसांत मूल्यांकनाची तयारी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, उपकेंद्रात आवश्यक मनुष्यबळ आणि पुरेशा साधनसुविधांचा अभाव असताना एवढ्या कमी कालावधीत ही तयारी कशी पूर्ण करायची, असा प्रश्न उपस्थित होत होता.

हेही वाचा: Junnar Crime: जुन्नर प्रकरणात मोठी अपडेट! चिमुकलीवरील अत्याचार-हत्येच्या आरोपीचा फोटो समोर; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

आत्महत्येच्या दिवशी राजीनामा दिल्याचा दावा

विशेष म्हणजे, आत्महत्या केलेल्या दिवशी सकाळीच डॉ. हाडे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर काही तासांतच त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागातील कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या प्रशासकीय दबावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आरोग्य अधिकारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, डॉ. हाडे यांच्यावर मूल्यांकनाची तयारी पूर्ण करण्यासाठी मोठा दबाव होता. आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध नसतानाही कमी वेळेत मोठ्या प्रमाणात काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणी नसताना केवळ कामाच्या आणि प्रशासकीय ताणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा संघटनेने केला आहे.

हेही वाचा: Crime News : प्रेयसीने प्रियकरला डोक्यात रॉड मारून संपवलं, नंतर लावली ट्रकला आग; तपासातील खुलासे ऐकून पोलिसही चक्रावले

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडूनही ताणाची माहिती?

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, डॉ. हाडे कामाच्या मानसिक तणावात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही मान्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

समुदाय आरोग्य संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील निष्पक्ष समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच चौकशी झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number