Pakistan Terror Infiltration after Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानच्या उपद्व्यापांवर काहीही परिणाम झालेला नाही. अजूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे, हे स्पष्ट आहे. कारण, पाकिस्तानी दहशतवादी संघटना (Terrorist Organizations) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष सीमारेषेजवळ एकूण 72 'लॉन्चपॅड्स' (Launchpads) उभारले आहेत. बीएसएफचे उपमहानिरीक्षक (DIG) विक्रम कुंवर यांनी सांगितले की, 'सरकारने आदेश दिले, तर आम्ही शत्रूला चारीमुंड्या चित करण्यास पूर्णपणे सज्ज आहोत.'
सियालकोट-जफरवालमध्ये 12 स्थायी लॉन्चपॅड्स
भारताशी थेट युद्धात टिकाव न लागणारा पाकिस्तान छुप्या मार्गांनी सतत कुरघोड्या करत आहे. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (BSF) यासंबंधीची माहिती दिली आहे. उपमहानिरीक्षक विक्रम कुंवर यांनी माहिती दिली की, पाकिस्तानच्या सियालकोट (Sialkot) आणि जफरवाल (Zafarwal) भागातील खोल दऱ्यांमध्ये 12 लॉन्चपॅड्स कायमस्वरूपी सुरू आहेत. याशिवाय, इतर वेगवेगळ्या ठिकाणी मिळून 60 लॉन्चपॅड्स सक्रीय आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या (ISI) मदतीने दहशतवादी संघटनांनी हे लॉन्चपॅड्स (Launchpads) उभारले आहेत.
घुसखोरीसाठी 'लॉन्चपॅड्स'चा वापर
सध्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र किंवा कोणताही मोठा तळ नाही, पण त्यांच्या हालचाली मात्र वाढल्या आहेत. सीमेजवळच्या भागात उभारलेले लॉन्चपॅड्स कायमस्वरूपी नसतात. भारतात घुसखोरी (Infiltration) करण्याच्या काही दिवस आधी किंवा दहशतवाद्यांची एखादी मोठी तुकडी घुसखोरी करणार असेल, तेव्हा सीमेलगत असे लॉन्चपॅड्स सक्रिय केले जातात, अशी माहिती विक्रम कुंवर यांनी दिली. याचाच अर्थ काही महिन्यांपूर्वी भारताचे लष्करी स्ट्राईक्स थांबवण्याच्या भिका मागणारा पाकिस्तान आता पुन्हा कुरापत काढण्याच्या स्थितीत दिसत आहे.
जैश आणि लष्कर-ए-तैय्यबाचे एकत्रित प्रशिक्षण
बीएसएफच्या उपमहानिरीक्षकांनी सांगितले की, पूर्वी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि लष्कर-ए-तैय्यबा (Lashkar-e-Taiba) या दोन दहशतवादी संघटनांचे दहशतवादी पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात सक्रिय होते आणि त्यांचे प्रशिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी चालायचे. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर या दोन्ही दहशतवादी संघटनांच्या अतिरेक्यांना आता एकत्र ठेवले जात असून, त्यांना एकत्रित प्रशिक्षण दिले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.