रत्नागिरी : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील महत्त्वाच्या रघुवीर घाटात कोसळलेली भलीमोठी दरड हटवण्यासाठी अखेर ब्रेकर मशीन दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात दरड कोसळून माती आणि मोठे दगड रस्त्यावर आल्याने गेल्या 24 तासांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 15 ते 20 गावांचा रत्नागिरीशी संपर्क प्रभावित झाला असून, नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने मोठे दगड हटवणे शक्य होत नसल्याने शनिवारी सकाळपासून ब्रेकर मशीनच्या सहाय्याने दगड फोडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आज, शनिवारी सायंकाळपर्यंत रघुवीर घाट वाहतुकीसाठी खुला करण्याचा विश्वास व्यक्त केला असून, तोपर्यंत मार्गावरील वाहतूक बंदच राहणार आहे.