Jalgaon: अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराने जळगाव पेटलं! संतप्त नागरिकांचा उद्रेक, वाहनांची जाळपोळ; अखेर पोलिसांनी…

बोदवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरील कथित अत्याचाराच्या आरोपानंतर संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड केली. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Jalgaon: अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराने जळगाव पेटलं! संतप्त नागरिकांचा उद्रेक, वाहनांची जाळपोळ; अखेर पोलिसांनी…

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयिताशी संबंधित ठिकाणी जाऊन वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. सध्या बोदवडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, खाजगी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या एका व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांचा जमाव आक्रमक झाला. त्यानंतर संशयिताच्या मूळ गावात काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली, तसेच तीन दुचाकींना आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय तीन कारचीही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोदवडमध्ये तैनात करण्यात आला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केल्याची माहिती आहे.

दरम्यान, संशयित आणि त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात अल्पवयीन पीडितेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number