मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या उत्सवाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आगमन मिरवणुकीदरम्यान 22 फूट उंच गणेशमूर्ती कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर मंडळाने यंदा भव्य मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी 11 दिवसांसाठी पूजेची लहान गणेशमूर्ती स्थापित करण्यात येणार असून आगमन आणि विसर्जन सोहळाही अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला जाणार आहे.
63 वर्षांच्या परंपरेत मोठा बदल
भुलेश्वरचा राजा मंडळ यंदा आपले 63वे वर्ष साजरे करत आहे. या मंडळाची ओळख दरवर्षी 20 ते 23 फूट उंचीच्या आकर्षक गणेशमूर्तीसाठी होती. यंदाही 22 फूट उंचीची विशेष मूर्ती तयार करण्यात आली होती. मात्र, आगमन सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण मंडळाला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि भावनिक वातावरणात यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
22 ऑगस्टला नेमकं काय घडलं?
22 ऑगस्ट रोजी भायखळ्यातून भुलेश्वरकडे गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक सुरू होती. मंडपापासून अवघ्या काही अंतरावर असताना अचानक मूर्तीचा तोल गेला आणि 22 फूट उंच मूर्ती कोसळली. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे (33) आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी (30) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये पाच आणि सात वर्षांच्या दोन लहान मुलींचाही समावेश होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
तपासात वेल्डिंगबाबत महत्त्वाची माहिती
या प्रकरणाचा तपास सुरू असताना मूर्तीकार अनिकेत देसाई यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यांच्या निवेदनातून काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यातून बाहेर काढल्यानंतर सुमारे 150 मीटर अंतरावर मूर्तीच्या मागील बाजूचे वेल्डिंग तुटल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यात नेऊन वेल्डिंग करण्यात आले. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच ती पुन्हा मिरवणुकीसाठी नेण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात वेल्डिंगमध्ये झालेल्या बिघाडामुळे मूर्तीचा तोल गेल्याची बाब समोर आली असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
साधेपणातून श्रद्धेला प्राधान्य
दुर्घटनेनंतर मंडळाने यंदा उत्सवात भव्यतेपेक्षा श्रद्धेला अधिक महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा लहान पूजेची मूर्ती, साधे आगमन आणि साधे विसर्जन अशा स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांकडून स्वागत केले जात असून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा हा महत्त्वाचा संदेश असल्याचे मानले जात आहे.