मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान घडलेल्या दुर्घटनेने गणेशभक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान मूर्ती कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर शोककळा पसरली आहे. दुर्दैवी घटनेनंतर मदतीचा हात पुढे करत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भुलेश्वरचा राजा मंडळाला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. भुलेश्वरच्या राजा गणेशोत्सव मंडळाला 11 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
या दुर्घटनेत जीव गमावलेल्या दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ही मदत जाहीर केली. गणेशोत्सवाच्या उत्साहात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. मात्र, संकटाच्या काळात एका गणेशोत्सव मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या मदतीसाठी पुढे येत सामाजिक बांधिलकीचं उदाहरण निर्माण केलं आहे. या मदतीमुळे दुर्घटनेत नुकसान झालेल्या मंडळाला आणि मृतांच्या कुटुंबीयांना काहीसा आधार मिळणार आहे.
*लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांचे, भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर वडिलकिचं छत्र.* *भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती दुर्घटनाग्रस्त होऊन दोन गणेशभक्तांच्या दूर्दैवी मृत्यूमुळे मंडळावर शोककळा.* *भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे… pic.twitter.com/vLnjm26Dl8 — Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) August 25, 2026