बीड: बीड शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लहान मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यावर भररस्त्यात विळ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. 21 जून रोजी घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी दोन महिन्यांनंतरही आरोपी मोकाट असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर घुगे हे इलेक्ट्रिक साहित्य खरेदी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील परिसरातून जात होते. त्याच वेळी एका लहान मुलाच्या सायकलचा धक्का दुचाकीला लागल्याने काही तरुणांनी त्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून घुगे यांनी मुलाची सुटका करण्याचा प्रयत्न केला आणि मारहाण करणाऱ्यांना जाब विचारला.
याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी घुगे यांच्यावर अचानक हल्ला चढवला. मुख्य आरोपी रोहित जाधव याने विळ्याने त्यांच्या डोक्यावर आणि डाव्या गालावर वार केल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांनी लाकडी फळीने त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या घुगे यांना चक्कर येऊन ते रस्त्यावर कोसळले. स्थानिकांनी तातडीने त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर पेठ बीड पोलीस ठाण्यात रोहित जाधव आणि तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिक आणि व्यापारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, भरचौकात अशा प्रकारे धारदार शस्त्राने हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात वाढत्या गुंडगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.