बीड जिल्हा रुग्णालयातील एका कथित वैद्यकीय हलगर्जीपणामुळे खळबळ उडाली आहे. सीझेरियन शस्त्रक्रियेनंतर 19 वर्षीय महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रकृती बिघडल्यानंतर संबंधित महिलेला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संध्या सूरज गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी सीझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
वेदना वाढत गेल्याने संध्या यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सोनोग्राफीसह काही तपासण्या करण्यात आल्या. तपासण्यांनंतर पोटात काहीतरी अनोळखी वस्तू असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.प्रकृती गंभीर असल्याने संध्या यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या पोटातून सर्जिकल ग्लोव्हज आणि कागद बाहेर काढल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.