Mohsin Naqvi Asia Cup Trophy Controversy Updates : आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा रोमांचक पराभव करत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने 147 धावांचे आव्हान पूर्ण केले. मात्र, हा मोठा विजय मिळवूनही भारतीय संघाला अद्याप विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. याचे कारण म्हणजे पाकिस्तानी मंत्री आणि ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारताने दिलेला स्पष्ट नकार.
ट्रॉफी हॉटेलमध्ये नेल्याने वाद वाढला
मोहसीन नक्वी हे ACC अध्यक्ष असण्यासोबतच पाकिस्तानी मंत्री आणि PCB प्रमुख असल्याने, सध्याच्या तणावाच्या राजकीय संबंधांमुळे त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला. बीसीसीआयने इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष खालिद अल झरूनी किंवा बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्या हस्ते ट्रॉफी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
परंतु, नक्वी यांनी ACC अध्यक्ष या नात्याने तो प्रस्ताव धुडकावून लावला आणि विजेतेपदाची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची मेडल्स स्वतःकडेच ठेवून ते हॉटेलमध्ये परतले. त्यांच्या या वर्तनामुळे बीसीसीआयने तीव्र संताप व्यक्त केला आणि आयसीसीकडे (ICC) तक्रार करण्याचा इशारा दिला. यानंतर आता नक्वी ही ट्रॉफी भारतीय संघाला देण्यास तयार झाले आहेत. मात्र, स्वतःकडे मोठेपणा घेण्याची त्यांची अजूनही इच्छा आहे. त्यामुळे आपल्याच हातून भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारावी, हा त्यांचा हेका कायम आहे.
हेही वाचा – PM Modi VS Moshin Naqvi : आशिया कप ट्रॉफीप्रकरण; मोहसिन नकवी बरळला, 'युद्ध हे अभिमानाचे माप असेल तर…'
नक्वी यांची नवी अट
ट्रॉफी वादामुळे मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाल्यानंतर आता मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी आणि मेडल्स भारतीय संघाला परत करण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.
औपचारिक सोहळ्याची मागणी: वृत्तानुसार, नक्वी यांनी ट्रॉफी आणि मेडल्स देण्यासाठी एक औपचारिक सोहळा आयोजित करण्यात यावा, अशी अट आयोजकांपुढे ठेवली आहे.
स्वतःच्याच हस्ते प्रदान: या सोहळ्यात नक्वी स्वतःच्या हस्ते भारतीय संघातील खेळाडूंना आणि कर्णधाराला मेडल्स व ट्रॉफी प्रदान करतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्याची तणावाची परिस्थिती पाहता, असा औपचारिक सोहळा आयोजित होण्याची चिन्हे नाहीत. तेव्हा, हा सर्व प्रकार पाहता, नक्वी यांचा भारताला आपल्यासमोर झुकायला लावण्याचा हा प्रयत्न असल्याचेच चित्र दिसत आहे. आता भारताकडून काय निर्णय घेतला जातो, हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण, पाकिस्तानसमोर आणि पाकिस्तानी मंत्र्यासमोर झुकू नये, हीच प्रत्येक क्रिकेटप्रेमी आणि भारतीयाचीही इच्छा आहे.
बीसीसीआयचा 'अल्टिमेटम'
मोहसीन नक्वी यांच्या वर्तनाविरुद्ध बीसीसीआयने कठोर भूमिका घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी नकवी यांना आपली चूक सुधारण्याची संधी दिली आहे.
मुदत: सैकिया यांनी आशा व्यक्त केली आहे की, ते शक्य तितक्या लवकर आशिया कप ट्रॉफी भारतीय संघाला परत करतील. जर असे झाले नाही, तर बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये दुबई येथे होणाऱ्या आयसीसी परिषदेत त्यांच्याविरुद्ध निषेध नोंदवून कारवाई करेल. याचा अर्थ मोहसीन नकवी यांच्याकडे ट्रॉफी भारतात परत करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.