Ashtavinayak Temples News : अष्टविनायक भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे महिनाभर बंद; हे आहे कारण

10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक येथील मंदिरे दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ashtavinayak Temples News : अष्टविनायक भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे महिनाभर बंद; हे आहे कारण

Ashtavinayak Temples Closed for A Month : अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत पुरातत्त्व विभागाने मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाचे मोठे काम हाती घेतले आहे. या कामाला गती देण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक येथील मंदिरे दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून भाविकांनी या काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि दुरुस्ती
पुरातत्त्व विभागामार्फत गेल्या 2 महिन्यांपासून श्री मयुरेश्वर मंदिर (मोरगाव), श्री चिंतामणी मंदिर (थेऊर) आणि श्री सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक) येथे दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा आणि सभामंडपाचे पौराणिक काळातील सुबक दगडी बांधकाम जतन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असल्याने आणि भाविकांच्या सततच्या वावरामुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मंदिरे बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून रीतसर परवानगी घेण्यात आली आहे.

हेही वाचा – Adhik Maas 2026: यंदा अधिक मास! आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी; जाणून घ्या दानधर्म, मुहूर्त आणि महत्त्व

धार्मिक विधी आणि प्रवेशाबाबत नियम
मंदिरे दर्शनासाठी जरी बंद असली, तरी श्री गणेशाची नित्य पूजा आणि इतर महत्त्वाचे धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहणार आहेत. मात्र, या 30 दिवसांच्या कालावधीत सामान्य भाविकांना प्रत्यक्ष गाभारा किंवा मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही. केवळ मंदिराचे पुजारी, अधिकृत अधिकारी, विश्वस्त आणि बांधकाम यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेशाची मुभा असेल. मंदिरांच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील सोयी-सुविधांसाठी हे काम अत्यंत गरजेचे असल्याचे देवस्थान ट्रस्टने नमूद केले आहे.

सहकार्याचे आवाहन
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी स्थानिक नागरिक आणि गणेशभक्तांना या नियोजित कामात प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याशी समन्वय साधून ही विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत भाविकांनी थेट दर्शनासाठी मंदिरात येणे टाळावे, जेणेकरून संवर्धनाचे काम अडथळ्याविना पार पडेल.

हेही वाचा – Kailash Mansarovar Yatra 2026: कैलास मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी सुरू; अर्ज करण्याची पद्धत आणि अटी जाणून घ्या

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version