देशाचे संरक्षणदलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले असून भीषण अपघात घडला आहे. तामिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कुन्नरमध्ये लष्करांचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे संरक्षणदलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या सह त्यांची पत्नी आणि प्रमुख अधिकारी होते. या अपघातामध्ये सैन्यप्रमुख बिपिन रावत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीडीएस बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात रावत यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना घडताच तामिळनाडूचे वनमंत्री के. रामचंद्रन घटनास्थळी दाखल झाले. तसेच अपघातस्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सरू आहे. तसेच आतापर्यंत एकूण ५ मृतदेह हाती लागल्याची माहिती वनमंत्री के. रामचंद्रन यांनी दिली आहे.
बिपीन रावत यांच्या अपघातबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेबाबत तपशील दिला आहे. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंबईचा दौरा रद्द करून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
एम.आय१७व्ही५ अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हेलिकॉप्टर आहे. लष्कराचे ताकदवान हेलिकॉप्टर म्हणून या हेलिकॉप्टरची ओळख आहे. या हेलिकॉप्टरचा वापर अनेक महत्त्वपूर्ण अभियानात वापर केला जातो तसेच वायुसेनेच्या वाहतुकीसाठी या हॅलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.