मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाही म्हणणाऱ्या रिअल इस्टेट एजंट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर भावेश कावरेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं झाला आहे. तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही, असं तो या व्हिडीओमध्ये म्हणाला. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून त्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. आधीच महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या खाद्यपदार्थांवरून अनेक मतभेद गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाले. यासर्व घडामोडी निवळत असताना आता रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेच्या व्हिडीओवरून पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. मांसाहारींना फ्लॅट न देण्याच्या वादानंतर सोशल मीडियावर नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहून शाकाहारी-मांसाहारी वादानंतर भावेश कावरे यांनी ती पोस्ट डिलीट केली. तसेच त्याने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत माफीनामा समोर आला आहे.
भावेश कावरे नमला, माफीनामा समोर
भावेश कावरेचा माफीनामा समोर आला आहे. यावेळी त्याने म्हटलं की, “माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय. त्यामध्ये मी म्हटलं होतं इथे व्हेजिटेरियन लोकांनाच घर भेटेल. त्या रूम मालकाची अट होती व्हेजिटेरियन लोकांना घर द्यायच आहे. तो स्वतः वारकरी आहे आणि मांसाहार करत नाही. त्यांची अशी इच्छा होती हा रूम व्हेजिटेरियनकडे जावा म्हणून मी व्हिडिओ बनवला होता. मला या व्हिडिओ मार्फत कोणत्याच नॉन व्हेजिटेरियनच मन दुखवायचं नव्हतं. ज्या कोणाचा मन दुखला असेल त्यांची मी मनापासून माफी मागतो. मी स्वतः मांसाहारी आहे. मराठी माणसांमध्ये ही वारकरी माळकरी लोक आहेत त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला होता. काही युवा नेते महाराष्ट्रातील मुलांची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हाला सांगू इच्छितो की यांच्याकडे लक्ष द्या.”
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील मराठीबहुल मानल्या जाणाऱ्या ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्यांना घर देण्यास नकार देणारी एक जाहिरात समोर आल्याने नवा वाद पेटला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला ब्रोकर भावेश कावरे याने एका इन्स्टाग्राम रीलद्वारे ताडदेवमधील एका इमारतीतील 2 BHK फ्लॅटची जाहिरात प्रसिद्ध केली. या व्हिडिओमध्ये त्याने, ‘जर तुम्ही प्युअर शाकाहारी असाल तरच कॉल करा. 900 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेले हे घर मांसाहार खाणाऱ्यांना मिळणार नाही,’ असे स्पष्ट विधान केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर नागरिक आणि विविध राजकीय संघटनांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
कोंबडीच्या पायाचा हार घात मनसेचा थेट इशारा
मांसाहार विरुद्ध शाकाहार या वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अत्यंत आक्रमक झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी, ‘ब्रोकरही आता बिल्डरांचीच भाषा बोलू लागले आहेत,’ असा थेट आरोप करत संबंधित ब्रोकरचा शोध घेऊन त्याचा योग्य तो समाचार घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. दुसरीकडे, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत, मराठी माणसाचा असा अपमान सहन केला जाणार नाही आणि याप्रकरणी ‘मनसे स्टाईल’ने उत्तर दिले जाईल, असे वक्तव्य केले आहे. इतकचं नव्हे तर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट कावरेच्या घरी जाऊन त्याच्या घरापुढच्या नेम प्लेटला कोंबडीच्या पायांचा हार घातला. या सर्व घडामोडी घडत असताना कावरेने या प्रकरणी माफी माफी मागितली आहे.