छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूच्या जीवघेण्या आजाराने एका सुखी-समाधानी कुटुंबाचे हसते-खेळते आयुष्य क्षणार्धात उद्ध्वस्त केले. छत्रपती संभाजीनगरमधील 11 वर्षीय सोहम ससेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, त्याचवेळी त्याचे आई-वडील आणि बहीणही गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत होते.
त्यामुळे सोहमचे पार्थिव शीतगृहात ठेवण्यात आले होते. वडील आणि बहिणीला सोहमच्या मृत्यूची बातमी सांगितल्यास त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची भीती होती. त्यामुळे आईने काळजावर दगड ठेवत तब्बल पाच दिवस आपल्या पोटच्या लेकाचे पार्थिव शीतगृहात ठेवण्याची विनंती केली.
दरम्यान, पती आणि मुलगी धोक्याबाहेर आल्यानंतर अखेर सोहमच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली. ज्या बापाने आपल्या लेकाला खांद्यावर खेळवले, त्याच बापाच्या खांद्यावर 12 वर्षीय सोहमचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आले.रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर आई-वडील आणि बहीण घरी परतत असताना त्यांच्यासोबत सोहमचे पार्थिवही होते.
हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून करंजखेड गावातील ग्रामस्थ आणि उपस्थितांचे डोळे अक्षरशः अश्रूंनी डबडबले होते या घटनेमुळे संभाजीनगर मध्ये शोककळा पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.