CJP नंतर आता 'डॉक्टर जनता पार्टी'ची घोषणा आयुष डॉक्टर जनता पार्टी (ADJP) लवकरच स्थापन होणार असल्याची घोषणा इंटिग्रेट डॉक्टर असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांनी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात बीएचएमएस (आयुष) डॉक्टरांना सीसीएमपी (CCMP) अभ्यासक्रमाद्वारे ॲलोपॅथी औषधं लिहून देण्याच्या निर्णयाविरोधात मार्ड (MARD) आणि आयएमए (IMA) च्या 2 लाखांहून अधिक डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
अशातच जनतेच्या, रुग्णांच्या हितासाठी आणि आयुष डॉक्टरांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष जनता पार्टी (ADJP) स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील आयुष डॉक्टरांना एकत्र आणून आरोग्यविषयक धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा पक्षाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. समाजसेवा, जनजागृती आणि सुलभ आरोग्यसेवेला प्राधान्य देत लवकरच पक्षाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा इंटिग्रेट डॉक्टर असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रात बीएचएमएस (आयुष) डॉक्टरांना सीसीएमपी (CCMP) अभ्यासक्रमाद्वारे ॲलोपॅथी औषधं लिहून देण्याच्या निर्णयाविरोधात मार्ड (MARD) आणि आयएमए (IMA) च्या 2 लाखांहून अधिक डॉक्टरांनी संप पुकारला होता. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात संपावर गेलेल्या डॉक्टरांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. रुग्णसेवा विस्कळीत होत असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत न्यायालयाने डॉक्टरांना तातडीने संप मागे घेण्याचे निर्देश दिले. तसेच, "संप मागे घेतल्यास आम्ही तुमची बाजू लवकरात लवकर ऐकून घेऊ," असे स्पष्ट आश्वासनही न्यायालयाने दिले.
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपामुळे अनेक सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (OPD), नियोजित शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सेवा प्रभावित झाल्या आहेत. आपत्कालीन सेवा सुरू असल्या तरी नियमित उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारने विशिष्ट अटींवर CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांच्या नोंदणीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला विरोध करत निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. या निर्णयामुळे आधुनिक वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होईल, असा दावा डॉक्टर संघटनांनी केला आहे. त्यामुळे आता CJP नंतर आता ADJP च्या माध्यमातून डॉक्टर समुदाय राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. डॉ. योगेश भालेराव यांच्या घोषणेनंतर वैद्यकीय क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही चर्चांना सुरुवात झाली आहे.