छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या कथा वर्षानुवर्षं आपल्याला प्रेरणा देत आहेत. केवळ महाराजांच्या पराक्रमावरच नव्हे, तर त्यांच्यासाठी लढणाऱ्या अनेक मावळ्यांच्याही शौर्यगाथा आपण वाचल्या आहेत. पावनखिंडीची लढाई, कोंढाण्याची लढाई यांसारख्या घटनांनी आपण आहजी प्रेरित होत असतो. या घटनांवर आधारित अनेक नाटकं, चित्रपटही मराठीमध्ये बनले आहेत. मात्र आता बॉलिवूडलाही मराठ्यांच्या या शौर्याची भुरळ पडली आहे. शिवछत्रपतींच्या एका खास सरदारावर आता हिंदीमध्ये चित्रपटनिर्मिती होत आहे. हा चित्रपटाचं नाव आहे- ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’… नावावरूनच लक्षात आलं असेल, की सिनेमा आहे तानाजी मालुसरे यांच्या सिंहगडाच्या लढाईसंदर्भात. बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे.
Taanaji releasing 22nd November, 2019. pic.twitter.com/dZ0e8A0Vwb — TAANAJI (@TaanajiTheFilm) September 25, 2018
या सिनेमाचा ‘महुरत शॉट’ नुकताच चित्रित झाला. खुद्द अजय देवगण यानेच यावेळचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे.
Taanaji Shoot Begins@TaanajiTheFilm pic.twitter.com/8lJnNDEWnA — Ajay Devgn (@ajaydevgn) September 25, 2018
‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ च्या पहिल्या पोस्टरवर एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात तलवार घेऊन लढणाऱ्या तानाजी मालुसरे यांची इमेज लोकांसमोऱ आली होती. या पोस्टरवरील शत्रूचा प्रतिकार करताना दिसणारे तानाजी मालुसरे ‘फर्स्ट लूक’मध्येच प्रेक्षकांना भावले आहेत. मराठी दिग्दर्शक ओम राऊत हा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. यापूर्वी ओमने ‘लोकमान्य: एक युगपुरूष’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आता हिंदी सिनेमातून सिंहगडाच्या लढाईचं भव्य चित्रिकरण करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. या सिनेमाची निर्मिती ‘टी-सीरिज’तर्फे भूषण कुमार करत आहे.
हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे मराठ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा जगभरातल्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.