आमिर हुसैन, प्रतिनिधी
बीड : वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. एवढेच नव्हे तर पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत आरोपीकडून तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवर तातडीने कारवाई करत आरोपीला शुक्रवारी रात्री चित्रपटगृहातून पीडितेसह ताब्यात घेतले.
शेख मुस्सवीर शेख वशीम याने तरुणीला बीड शहरातील एका चित्रपटगृहात नेल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस पथकाने विलंब न करता संबंधित चित्रपटगृह गाठले. तेथे आरोपी शेख मुस्सवीर आणि तरुणीला ताब्यात घेऊन दोघांनाही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेची चौकशी करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मुस्सवीर शेख वशीम (रा. हीना पेट्रोल पंपामागे, मकसूद कॉलनी, बीड) याने पीडितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढले होते. हे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत तो तिच्यावर दबाव आणत असल्याचेही तपासात समोर आले. शुक्रवारी रात्रीही धमकी देऊन तिला चित्रपटगृहात येण्यास भाग पाडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.