विजय चिडे, प्रतिनिधी
कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : कन्नड शहरात भररस्त्यात झालेल्या चाकू हल्ल्यात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कन्नड पोलीस ठाण्यासमोरील रेणुका ज्वेलर्ससमोर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत झाले. धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात नविद शेख अकरम या तरुणाचा मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नातेवाईकांनी मृत अकरमला मोटरसायकल वरून दवाखान्यात पोहोचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रविवारी मध्यरात्री दोन सख्ख्या भावांमधील कौटुंबिक वादाचे रूपांतर टोळीयुद्धात आणि हत्याकांडात झाले. दोन भावांच्या वैयक्तिक वादात भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा पोलीस ठाण्याच्या दारातच धारदार चाकूने मानेवर आणि पोटावर वार करून निर्घृण खून करण्यात आला. नवीद शेख अकरम (वय 25, रा. टिळकनगर, कन्नड) असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कन्नडमधील करीमनगर येथील रहिवासी असलेले आदिल खान उस्मान खान आणि त्यांचा सख्खा भाऊ वहाब उस्मान खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ज्यामुळे दोघांनीही एकमेकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यासाठी कन्नड शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांची तक्रार नोंदवून घेत त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस बंदोबस्तात ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. दरम्यान, वहाब खान यांचा मुलगा परवेज खान याला दुसऱ्या गटाकडून पोलीस ठाण्याच्या परिसरातच मारहाण होण्याची भीती वाटल्याने, त्याने फोन करून आपल्या काही मित्रांना तातडीने मदतीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानुसार अझर शेख नूर आणि मृत नवीद शेख अकरम यांच्यासह काही मित्र रात्री पोलीस ठाण्याच्या परिसरात पोहोचले. या थरारक हत्याकांडप्रकरणी जखमी मित्र अझर शेख नूर याने दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात एकूण 7 जणांविरुद्ध खुनाचा आणि संघटित हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.